आपला जिल्हामहाराष्ट्र
होळ गावात वीज वितरण विभागाचा भोंगळ कारभार; लाईनमनकडून लाईटचा काळाबाजार उघड.
होळ (प्रतिनिधी) : होळ गावात महावितरणच्या (एमएसईबी) वीज वितरण व्यवस्थेतील भोंगळ कारभार समोर आला आहे. ऊस तोडणीसाठी दरवर्षी अनेक कुटुंबे सहा-सात महिन्यांसाठी कर्नाटकसारख्या राज्यांमध्ये स्थलांतर करतात. त्यांच्या घरातील लाईट वापर पूर्णतः बंद असतानाही मोठ्या प्रमाणावर लाईट बील येत असल्याने हे नागरिक त्रस्त झाले आहेत. या आर्थिक अडचणीमुळे अनेक ऊसतोड मजुरांना लाईट बील भरता न आल्याने महावितरण विभागाकडून त्यांची वीज सेवा कट करण्यात आली. मात्र, त्यानंतर गावातील काही लाईनमनकडून संबंधित ग्राहकांकडून आर्थिक लाभ घेऊन थेट मीटरशिवाय घरात वीज जोडणी देण्यात येत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. गावातील अनेक घरांमध्ये असे बेकायदेशीर थेट लाईट कनेक्शन देण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकारात होळ गावासाठी जबाबदार असलेला लाईनमन स्वतः सहभागी असल्याची माहिती समोर येत आहे. ग्राहकाकडून थोडीशी रक्कम घेऊन "तुमचे मीटर तर कापले आहे, त्यामुळे आता बील येणार नाही. पण लाईट तुम्हाला मिळेल," असे सांगून थेट लाईट जोडले जात असल्याची कबुली काही नागरिकांनी दिली आहे. काही वेळेस, "ऊसतोडीला जाताना थोडे पैसे द्या आणि आल्यावर उरलेले द्या," अशी मागणी केली जात असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या सगळ्या प्रकारामुळे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडतो की जर थेट लाईट जोडणी मिळत असेल, तर मग मीटरचा उपयोग काय? अशा प्रकारचा वीजेचा काळाबाजार थेट अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने होत आहे की काय, असा संशय व्यक्त होत आहे. या गंभीर प्रकाराची तातडीने चौकशी करून संबंधित भ्रष्ट वायरमेनवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होळमधील सर्व वीज ग्राहकांकडून होत आहे.
