ताज्या घडामोडी
सेवानिवृत्तीच्या दिवशी शिक्षकाने दिला पर्यावरण संवर्धनाचा आदर्श; भास्कर सरवदे यांच्या हस्ते भव्य वृक्षारोपण ग्रामविकासासाठी लोकप्रतिनिधींनाही दिला कृतीतून संदेश
होळ | प्रतिनिधी शिक्षक हा केवळ विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक नसून समाजालाही दिशा देणारा असतो, याची प्रचिती होळ येथील ज्येष्ठ शिक्षक तथा वृक्षमित्र भास्कर सरवदे यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या दिवशी दिली. निरोप समारंभावर खर्च करण्याऐवजी त्यांनी होळ–बीड–लातूर महामार्गालगत आंब्याच्या रोपांचे भव्य वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश दिला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून सन १९९६ मध्ये कोदरी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून नियुक्त झालेल्या भास्कर सरवदे यांनी आपल्या ३० वर्षांच्या सेवाकाळात कोदरी, लाडेवडगाव, केकत सारणी आणि होळ अशा विविध गावांमध्ये विद्यार्थीकेंद्रित उपक्रम राबवत एक आदर्श शिक्षक म्हणून वेगळी ओळख निर्माण केली. गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी सातत्याने केलेले कार्य आजही अनेकांच्या स्मरणात आहे. सेवानिवृत्तीच्या निमित्ताने होळ–बीड–लातूर रस्त्यालगत लावण्यात आलेली आंब्याची रोपे भविष्यात हिरवीगार आमराई म्हणून उभी राहतील. त्या झाडांची फळे खाताना प्रत्येकाला या उपक्रमामागील भास्कर सरवदे सरांची आठवण येईल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, गावात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाची अपेक्षा असताना एका जिल्हा परिषद शिक्षकाने स्वतः पुढाकार घेऊन पर्यावरण संवर्धनाचा आदर्श घालून दिला. त्यामुळे हा उपक्रम ग्रामविकास संस्था, लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायतीसाठीही आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारा ठरत असल्याची चर्चा गावात रंगली. गावाचा विकास केवळ योजनांमधून नव्हे, तर कृतीतूनही घडतो, हा संदेश सरवदे यांनी आपल्या कार्यातून दिला. या वृक्षारोपण कार्यक्रमास माजी पंचायत समिती उपसभापती नेताजी शिंदे, धनराज लाटे, वडगाव पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार सय्यद साहेब, ॲड. अजमेर शेख, ॲड. राजेभाऊ शिंदे, पत्रकार शुभम खाडे, पत्रकार उत्तरेश्वर शिंदे, पवन शिंदे, रमाकांत सरवदे, अलंकार सरवदे, सत्वशील कांबळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर होळ ग्रामपंचायतीत भास्कर सरवदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी, ग्रामसेवक वरपे साहेब, योगेश भैया शिंदे, बाळासाहेब घुगे, तानाजी शिंदे, हनुमंत घुगे तसेच सरवदे सरांवर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेवानिवृत्तीचा दिवस केवळ निरोपाचा न ठेवता समाजासाठी कायमस्वरूपी स्मरणात राहील असा पर्यावरणाचा वारसा निर्माण करणाऱ्या भास्कर सरवदे यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, गावागावातील इतर सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही अशाच समाजोपयोगी उपक्रमांचा आदर्श घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




