ताज्या घडामोडी

खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते कोल्हापुरात आर्किटेक्ट अमोल लोणकर पुरस्काराने सन्मानित अल्पदरातील घरांच्या संकल्पनेतून सर्वसामान्यांच्या स्वप्नांना दिला आकार; वास्तुकला, बांधकाम व रिअल इस्टेट क्षेत्रातील कार्याची दखल

बीड अल्पदरातील घरांच्या संकल्पनेतून सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबांची स्वप्नातील घरे साकार करणारे वास्तुविशारद अमोल आत्माराम लोणकर यांना नवराष्ट्र राजर्षी छत्रपती शाहू महाराज सन्मान २०२६ ने सन्मानित करण्यात आले. कोल्हापूर येथे आयोजित सोहळ्यात खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रमुख हस्ते लोणकर यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. वास्तुकला, रिअल इस्टेट आणि बांधकाम क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली. या सोहळ्यास महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, संजय घोडावत विद्यापीठाचे संस्थापक संजय घोडावत, नवभारत नवराष्ट्र समूहाचे सीओओ ए. श्रीनिवास, राज्य कार्यकारी संपादक संजय मलमे यांची प्रमुख उपस्थिती होती. मूळचे निपाणी जवळका, ता. गेवराई येथील अमोल लोणकर सध्या बीडमध्ये वास्तव्यास आहेत. गेवराई, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये वास्तुकला, बांधकाम विकास आणि रिअल इस्टेट क्षेत्रात काम करताना त्यांनी हजाराहून अधिक कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी योगदान दिले आहे. अमोल लोणकर यांचे वडील कै. आत्माराम त्रिंबकराव लोणकर हे शासकीय कंत्राटदार होते. लोणकर दहावीत शिक्षण घेत असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे लहान बंधू अनिल आत्माराम लोणकर यांनी त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी सांभाळली. २००३ मध्ये विवाहानंतर त्यांनी गेवराई येथे आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. गणेश धुमाळ, अरुण चाळक आणि मयुर जोजारे यांच्यासह त्यांनी सुरुवातीच्या काळात काम केले. २००३ ते २००७ या कालावधीत ७ लाख ९९ हजार ते १३ लाख ९९ हजार रुपयांपर्यंतच्या किमतीतील १ बीएचके आणि २ बीएचके प्रकारातील एक हजाराहून अधिक रो-हाऊसेसच्या नियोजनात त्यांचा सहभाग राहिला. बंडू आगलावे यांच्या आग्रहाने २००७ मध्ये अमोल लोणकर बीडमध्ये आले. बीड शहराच्या हद्दवाढीच्या प्रारूप नियोजनाच्या कामानंतर त्यांनी शहरातील विविध बांधकाम आणि गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये योगदान दिले. २०१५-१६ मध्ये अशोक लोढा यांच्या सहकार्याने ‘लोढा नगरी’ प्रकल्पातील ६७ रो-हाऊसेसचे नियोजन करण्यात आले. ६ लाख ९९ हजार रुपयांपासून उपलब्ध असलेल्या या घरांची एका दिवसात नोंदणी पूर्ण झाली होती. अजय घोडके, संदेश लोळगे आणि विजय बंब यांच्यासह अनेक विकासकांसोबत लोणकर यांनी विविध प्रकल्पांवर काम केले आहे. २०१० मध्ये त्यांच्या वास्तुकला नियोजन, बांधकाम विकास आणि रिअल इस्टेट कार्यालयाचे उद्घाटन छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते झाले होते. आता खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते सन्मान मिळाल्याने हा आपल्या आयुष्यातील विशेष योगायोग असल्याची भावना अमोल लोणकर यांनी व्यक्त केली. ---- दीर्घकाळ सामाजिक कार्यात सक्रिय अमोल लोणकर हे इंदौर येथील श्री गुरुदेव धार्मिक व परमार्थिक ट्रस्टचे प्रिन्सिपल वास्तुविशारद म्हणूनही कार्यरत आहेत. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये मॉड्युलर व्हिलेज, संत नगरी, वसतिगृहांसह विविध प्रकल्पांच्या नियोजनाचे काम ते करीत आहेत. मराठा क्लबचे संस्थापक अध्यक्ष तसेच पोलिस बॉईज संघटनेचे मराठवाडा संघटक म्हणूनही ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असून मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतही ते दीर्घकाळ सामाजिक कार्यात जोडलेले आहेत. ----- वास्तुकलेचा कौटुंबिक वारसा अमोल लोणकर यांचा मुलगा अमेय लोणकर आणि पुतणी अपर्णा लोणकर हे दोघेही आर्किटेक्चरचे शिक्षण घेत आहेत. त्यामुळे वास्तुकलेचा कौटुंबिक वारसा पुढील पिढीकडेही पुढे जात असल्याचे दिसून येत आहे. वास्तुकला आणि सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात तरुणांसाठी मोठ्या संधी उपलब्ध असून नव्या पिढीने या क्षेत्राकडे करिअरच्या दृष्टीने गांभीर्याने पाहावे, असे आवाहन अमोल लोणकर यांनी केले. ----- हजाराहून अधिक घरांचे नियोजन गेवराई, बीड आणि छत्रपती संभाजीनगर येथे हजाराहून अधिक घरांच्या नियोजन व निर्मितीत योगदान. २००३ ते २००७ या काळात एक हजाराहून अधिक रो-हाऊसेसच्या नियोजनात सहभाग. बीडमधील लोढा नगरी प्रकल्पात ६७ रो-हाऊसेसचे नियोजन करण्यात आले असून त्यांची किंमत ६ लाख ९९ हजार रुपयांपासून होती. ----- सामान्यांच्या घरकुलाचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न अल्पदरात दर्जेदार आणि नियोजनबद्ध घरे उपलब्ध करून सर्वसामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी सातत्याने काम केले. वास्तुकला ही केवळ इमारती उभारण्याची प्रक्रिया नसून कुटुंबांच्या स्वप्नांना आकार देण्याचे माध्यम असल्याची भावना अमोल लोणकर यांनी व्यक्त केली.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!