ताज्या घडामोडी
धोंड्याचा महिना, सोशल मीडियाची स्पर्धा आणि आई-वडिलांच्या मनातील वेदना
लेखक पत्रकार उत्तरेश्वर शिंदे.9156101056 मास महिना म्हणजे महाराष्ट्राच्या परंपरेतील एक जिव्हाळ्याचा काळ. या महिन्यात विवाहित मुलीला माहेरी बोलावून जावयाचा मानपान केला जातो. अनेक कुटुंबांमध्ये ही परंपरा आजही प्रेमाने आणि आनंदाने पाळली जाते. मात्र बदलत्या काळात या परंपरेला सोशल मीडियाच्या दिखाव्याची किनार लागल्याचे चित्र दिसत आहे. आज फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर धोंडे जेवणाचे व्हिडिओ, रील्स आणि फोटो मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. सजवलेले ताट, जावयाचा सत्कार, महागड्या भेटवस्तू आणि त्याचे व्हिडिओ हजारो लोकांपर्यंत पोहोचतात. हे पाहून अनेकांना आनंद वाटतो, परंतु या चमकदार चित्रामागे काही आई-वडिलांच्या डोळ्यांतील अश्रू मात्र कुणाला दिसत नाहीत. समाजात अशीही अनेक कुटुंबे आहेत ज्यांनी मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढले, आयुष्यभराची बचत खर्च केली किंवा वर्षानुवर्षे कष्ट करून संसार उभा केला. लग्नानंतर काही वर्षेही उलटलेली नसताना त्यांच्यावर कर्जाचा डोंगर असतो. घरात कधी तेल असते तर मीठ नसते, कधी मीठ असते तर भाजी घेण्याची सोय नसते. अशा परिस्थितीतही समाज काय म्हणेल, मुलगी नाराज होईल का, जावयाला वाईट वाटेल का या विचाराने अनेक पालक स्वतःच्या परिस्थितीपेक्षा मोठा खर्च करण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये दोष कोणाचा आहे, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. मुलींचा, पालकांचा की सोशल मीडियाचा? कदाचित कोणाचाच नाही. पण नकळत निर्माण झालेली तुलना आणि दिखाव्याची स्पर्धा अनेक कुटुंबांना मानसिक व आर्थिक ताण देत आहे. एका मुलीची मैत्रीण सोशल मीडियावर धोंडे जेवणाचा व्हिडिओ टाकते. हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळतात. मग दुसऱ्या मुलीच्या मनातही तसाच कार्यक्रम करण्याची इच्छा निर्माण होणे स्वाभाविक आहे. पण प्रत्येक घराची आर्थिक परिस्थिती सारखी नसते. प्रत्येक वडील शासकीय अधिकारी नसतो, प्रत्येक आई नोकरी करणारी नसते. अनेक पालक शेतमजुरी करतात, छोटे व्यवसाय करतात किंवा रोजंदारीवर कुटुंब चालवतात. मुलींनो, एक क्षण विचार करा. ज्या आई-वडिलांनी आपल्या आनंदासाठी आयुष्यभर कष्ट केले, आपल्या लग्नासाठी कर्जाचा भार उचलला, त्यांच्यावर केवळ सोशल मीडियावरील एका रीलसाठी किंवा इतरांच्या अपेक्षांसाठी अतिरिक्त खर्चाचा बोजा टाकणे योग्य आहे का? खरा सन्मान हा महागड्या जेवणात, भेटवस्तूंमध्ये किंवा सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमध्ये नसतो. खरा सन्मान आई-वडिलांच्या परिस्थितीची जाणीव ठेवण्यात, त्यांच्या कष्टांचा आदर करण्यात आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य आणण्यात असतो. उद्या प्रत्येक मुलगी स्वतःही एखाद्या मुलीची आई होणार आहे. त्या वेळी आई-वडिलांच्या मनातील चिंता, त्यांचे आर्थिक गणित आणि त्यांच्या प्रेमाची किंमत अधिक चांगल्या प्रकारे समजेल. म्हणून परंपरा जपा, नातेसंबंध जपा, पण तुलना आणि दिखाव्याच्या स्पर्धेत आई-वडिलांच्या कष्टांवर पाणी फेरू नका. धोंड्याचा महिना हा प्रेमाचा असावा, प्रदर्शनाचा नाही. तो आई-वडिलांच्या सन्मानाचा असावा, त्यांच्या आर्थिक वेदनांचा नाही. — लेखक : उत्तरेश्वर रघुनाथ शिंदे पत्रकार, भरारी न्यूज




