ताज्या घडामोडी
“तहानलेल्या जनतेसाठी रवी भैया जोगदंड यांची मानवतेची पानपोई”
अंबाजोगाई : उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून शहरातील तापमान ४० अंशांच्या आसपास पोहोचले आहे. प्रखर उन्हामुळे नागरिकांचे जनजीवन अक्षरशः होरपळून निघत आहे. अशा कडक उन्हात छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात मोठी वर्दळ पाहायला मिळते. याच ठिकाणी अनेक गोरगरीब व्यापारी, फळविक्रेते व हातगाडी चालक आपला उदरनिर्वाह चालवतात. मात्र, त्यांच्या सोयीसाठी ना सावलीची व्यवस्था आहे, ना पिण्याच्या पाण्याची. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांसाठी नेहमीच पुढाकार घेणारे रवी भैया जोगदंड यांनी एक आदर्श उपक्रम राबवला आहे. त्यांनी शिवाजी चौकात निशुल्क थंडगार पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून ‘पानपोई’ सुरू केली आहे. कडक उन्हात तहानलेल्या नागरिकांना आणि कष्टकरी वर्गाला या पानपोईमुळे मोठा दिलासा मिळत आहे. विशेषतः दिवसभर उन्हात काम करणाऱ्या विक्रेत्यांसाठी हा उपक्रम जीवनदायी ठरत असून, “मानवतेची खरी ओळख अशाच कृतीतून होते” याचा प्रत्यय या उपक्रमातून येत आहे. रवी भैया जोगदंड यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, इतरांनीही अशा प्रकारचे लोकहिताचे उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.




