ताज्या घडामोडी
अंबाजोगाईत वाहतुकीस अडथळा करणाऱ्या ट्रक चालकावर गुन्हा दाखल; ट्रक जप्त करून कारवाई
अंबाजोगाई शहरात सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या ट्रक चालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10.45 ते 10.55 वाजण्याच्या सुमारास मोंढा मार्केट परिसरातील सतीश सर्विस पॉईंटसमोर यशवंतराव चव्हाण चौकाकडून येणाऱ्या मुख्य रस्त्यावर एक मालवाहू ट्रक उभा करण्यात आला होता. सदर ट्रक (क्रमांक MH24AU7741) रस्त्यावर उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता होती. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित चालकाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 285 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित ट्रक जप्त करून पोलीस स्टेशनला आणला. त्यानंतर नियमाप्रमाणे पुढील कारवाई करून ट्रक चालकाच्या ताब्यात देण्यात आला आहे. दरम्यान, व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांसमोर माल चढ-उतार करताना रस्त्यावर कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची विशेष खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच शक्यतो गर्दीच्या वेळेत लोडिंग-अनलोडिंग टाळावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.




