फार्मसी महाविद्यालयात ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
अंबाजोगाई : श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित बी. फार्मसी महाविद्यालय, अंबाजोगाई येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात, अभिमानाने आणि देशभक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता झाली. सर्व मान्यवर, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचे स्वागत आनंदमय वातावरणात करण्यात आले. उद्घाटन सोहळा मंडळाचे संस्थापक सचिव मा. राजकिशोर मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून स्वातंत्र्य दिनाचा ऐतिहासिक संदर्भ देत, युवापिढीला राष्ट्रासाठी कार्य करण्याची प्रेरणा दिली. यानंतर ध्वजवंदन सोहळा पार पडला. ध्वजारोहणाची जबाबदारी श्री संकेत राजकिशोर मोदी यांनी पार पाडली. राष्ट्रगीताच्या गजरात सर्वांनी राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवत हा क्षण अभिमानास्पद ठरवला. ध्वजवंदनानंतर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं, नृत्य, कविता आणि लघुनाटिका सादर करत शहीदांची आठवण जागवली. त्यांच्या सादरीकरणातून देशप्रेम, बलिदान व राष्ट्रीय मूल्यांचा संदेश दिला गेला. यानंतर वक्तृत्व आणि माहितीपर सत्रात निवडक वक्त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास उलगडून दाखवत स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा गौरव केला. तसेच तरुणांना सामाजिक योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. मंदार चौधरी यांनी सर्व शिक्षक, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचे सहकार्याबद्दल आभार मानले. प्राचार्य डॉ. संतोष तरके यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे अभिनंदन करताना सांगितले की, "अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती जागृत होते व सामाजिक भान निर्माण होते. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी हीच खरी शिदोरी आहे." या कार्यक्रमाला महाविद्यालयातील डॉ. गितांजली चव्हाण, काव्या रेड्डी, अश्विनी घोळकर, मंजुषा करेप्पा, अमर कावरे, विशाल साखरे, इम्रान सय्यद, मामूण कुरेशी, गणेश गिरी, ज्योती मुरकुटे यांच्यासह इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.