आपला जिल्हामहाराष्ट्र
कुमठा गावातील समाजमंदिर जुगाराच्या अड्ड्यात रुपांतर; प्रशासनाचे दुर्लक्ष धक्कादायक!
किल्लारी (प्रतिनिधी) – लातूर जिल्ह्यातील कुमठा गावामधील समाजमंदिर सध्या जुगाराच्या अड्ड्यात रूपांतरित झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. येथे दररोज दिवसाढवळ्या खुलेआम पत्त्याचा क्लब भरवला जात असून, हजारो रुपयांची उलाढाल होत आहे. विशेष म्हणजे, ही सर्व अवैध कारवाई किल्लारी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असूनही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाही. स्थानिकांच्या माहितीनुसार, गावातील काही लोकांनी ऊसतोड मजुरांकडून मिळालेली उचल जुगारात हरवली आहे. यामुळे अनेक कुटुंबांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. मातंग समाजाच्या समाजमंदिरात हे पत्त्याचे अड्डे भरवले जात असून, समाजमंदिराचा उपयोग जुगारासाठी केला जातो ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. गावात दिवसाढवळ्या पत्त्याचे डाव रंगत असून, यात स्थानिक तरुण मोठ्या संख्येने अडकत चालले आहेत. शिक्षण, कामधंदा, आणि घरगुती जबाबदाऱ्या बाजूला ठेवून या अवैध क्लबमध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गावकऱ्यांनी या प्रकारावर चिंता व्यक्त करत किल्लारी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणाची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना असूनही कारवाई होत नसल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. समाजामध्ये नैतिकता, जबाबदारी आणि सुरक्षितता टिकवण्यासाठी पोलिसांनी अशा प्रकारच्या अड्ड्यांवर तातडीने छापे टाकून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे.
