आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीय
धनराज लाटे यांची भाजप युवा मोर्चा केज तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती – वर्षानुवर्षांपासून पदाशिवाय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मेहनतीला मान्यता
होळ (प्रतिनिधी): राजकारणात अनेक जण केवळ पदाच्या माध्यमातून स्वतःचे नाव मोठे करण्याच्या हेतूने कार्य करतात. मात्र, होळ गावातील भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते धनराज लाटे यांनी मात्र कुठलेही पद नसतानाही गेल्या अनेक वर्षांपासून गावासाठी सातत्याने कार्य करत उदाहरण निर्माण केले आहे. धनराज लाटे यांनी भाजपच्या विचारधारेप्रती निष्ठा ठेवून पक्षाचे बिनपदाचे कार्यकर्ते म्हणून काम करत असताना गावात विविध विकासकामे, शासन योजना, गोरगरीबांसाठी मदत, तसेच समाजोपयोगी उपक्रम राबवले. त्यांनी होळ गावासाठी लाखो रुपयांची विकासकामे मंजूर करून आणली, ही एक मोठी बाब ठरते. याच कार्याची दखल घेत भाजप युवा मोर्चा, केज तालुका उपाध्यक्षपदी धनराज लाटे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना हा नियुक्तीपत्र केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार नमिता ताई मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा यांच्या हस्ते देण्यात आले. या वेळी कार्यक्रमाला भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर (काका) मुंदडा, भाजप तालुका अध्यक्ष भगवान केदार, विष्णू घुले, नेताजी शिंदे, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राजपाल (भैया) काकडे आदी मान्यवर उपस्थित होते. या निवडीबद्दल होळ व परिसरातील युवकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असून, कार्यकर्त्यांच्या निष्ठेला मिळालेली ही पावती भाजपच्या संघटनात्मक बळाचे प्रतीक ठरत आहे.




