आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीय
होळमध्ये दोन महत्त्वपूर्ण राजकीय नियुक्त्या – बाळासाहेब घुगे व सुमनताई राख यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
होळ (प्रतिनिधी) आज होळ गावात भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राजकीय कार्यकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरला आहे. गावातील दोन प्रमुख स्थानिक नेत्यांना भाजपच्या विविध पदांवर नेमणूक देण्यात आली असून, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. होळ ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच बाळासाहेब घुगे यांची राजकीय कार्यातील निष्ठा, अनुभव व योगदान लक्षात घेऊन त्यांची महत्त्वपूर्ण नेमणूक करण्यात आली आहे. बाळासाहेब घुगे हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचे सक्रिय विचारवंत व एकनिष्ठ कार्यकर्ते असून, त्यांनी पाच वर्षे ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून प्रभावी कामकाज पाहिले आहे. सध्या ते उपसरपंच म्हणून ग्रामपंचायतीत कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे, भाजप महिला मोर्चाच्या केज तालुकाध्यक्षपदी सुमनताई राख यांची निवड करण्यात आली आहे. सुमनताई राख या होळ ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच असून, त्यांनी आपल्या कार्यकाळात गावाच्या विकासासाठी सातत्याने काम केले आहे. त्यांचेही भाजपमध्ये दीर्घकाळाचे योगदान असून, त्या कै. गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या कार्यकाळापासून पक्षासाठी समर्पित आहेत. भाजपच्या संघटन विस्तारात व केज विधानसभा मतदारसंघातील निवडणुकांमध्ये बाळासाहेब घुगे व सुमनताई राख या दोघांचेही मोलाचे योगदान आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आमदार कार्यालयाच्या वतीने नेमणुकीचे पत्र प्रदान करण्यात आले. या वेळी केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नामिता ताई मुंदडा यांचे पती व केज तालुका भाजप अध्यक्ष तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्याहस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून दोन्ही पदाधिकाऱ्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. भरारी न्यूज परिवाराकडून बाळासाहेब घुगे व सुमनताई राख यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
