आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र
काळ्या बाजारातील राशन पकडल्याप्रकरणी धारूर पोलिसांचा पुरवठा विभागाला अहवाल पुरवठा विभागाच्या कारवाईकडे लागले लक्ष
प्रतिनिधी | धारूर दि.१५ : गोरगरीब राशन कार्डधारकांना दिले जाणारे स्वस्त धान्य काळ्या बाजारात खरेदी करणारे रॅकेट सक्रिय असल्याचे उघड झाले आहे. धारूर तालुक्यातील व्यापाऱ्यांनी केवळ स्थानिक नव्हे, तर केज तालुक्यातील होळ येथील राशनचे धान्य देखील खरेदी केल्याचे सोमवारी पोलिसांच्या कारवाईत उघड झाले. याचा अहवाल पोलिसांनी धारूर तहसीलच्या पुरवठा विभागला दिला आहे. धारूर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी टाकलेल्या धाडीत काळ्या बाजारात विक्रीसाठी आलेली १०७ धान्याची पोती जप्त केली. याबाबत पंचनामा करून पोलिसांनी तहसीलच्या पुरवठा विभागाला अहवाल सादर केला आहे. पकडलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ६ लाख १३ हजार ८२० रुपये इतकी असल्याचे समोर आले आहे. यात राशनच्या १०८ गोण्या आढळून आले. त्यामध्ये २५ क्विंटल गहू तर १९ क्विंटल तांदूळ असे एकूण ४४ क्विंटल धान्य जप्त केले आहे. हे पोलिसांनी पकडलेले धान्य केज तालुक्यातील होळ येथील असल्याचे स्पष्ट झाले असून, या प्रकरणाची चौकशी झाल्यास आणखी काही बाबी उघड होण्याची शक्यता आहे. आता तहसील प्रशासन राशनचा काळाबाजार प्रकरणात कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे काळाबाजार धारूर तालुक्यात ऊसतोडीसाठी मजुरांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे या भागात राशनच्या धान्याची मोठी मागणी असते. सध्या प्रधान्यक्रम अन्नसुरक्षा योजना व अंत्योदय योजनेतून लाभार्थ्यांना मोफत धान्य देण्यात येत असले तरी पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे या धान्याचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास येत आहे. कालच्या प्रकाराला केजचा तालुका पुरवठा विभाग जबाबदार आहे.




