आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र
होळच्या राशन दुकानाचे धान्य काळ्या बाजारात जाताना धारूर पोलिसांनी पकडले राशन दुकानदार अशोक घुगेकडून ४४ क्विंटल धान्य आणल्याची वाहन चालकाची कबुली
प्रतिनिधी | धारूर दि.१४ : केज तालुक्यातील होळ येथील राशन दुकानातून टेम्पोने काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असलेला गहू पोलिसांनी पाठलाग करून धारूर शहरातील एका दुकानासमोर पकडला. ही कारवाई पोलिसांनी सोमवारी (दि.१४) दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास केली. सदरील धान्य होळ येथील राशन दुकानदार अशोक तुकाराम घुगे याच्याकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली वाहनचालकाने दिली. यात एकूण ४४ क्विंटल धान्य जप्त करण्यात आले. आडस येथील चौकात उभे असलेल्या पोलिस कर्मचार्यांना आडसमधून धारूरच्या दिशेने जात असलेला छोटा टेम्पो (क्र.एम.एच. 44 यू 2257) दिसून आला. पोलिसांना संशयास्पद वाटल्याने त्याचा पाठलाग केला. तेव्हा धारूरमधील एका धान्याच्या दुकानासमोर टेम्पो उभा दिसून आला. यावेळी पोलिसांनी चौकशी केली असताना चालकाने त्याचे नाव इब्राहिम खाजा (रा.धारुर) असे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत धान्याच्या कसल्याही पावत्या आढळून आल्या नाहीत, तसेच सदरील धान्य राशनचे असल्याचा संशय आल्यावरून पंचनामा केला. यावेळी वाहन चालकाने होळ येथील राशन दुकानदार अशोक तुकाराम घुगे याच्याकडून माल घेऊन धारूरच्या मोंढ्यात विक्रीसाठी देत असल्याची कबुली पंचनाम्यात दिली. पुरवठा विभागाकडे नोंदीनुसार, अशोक घुगे याचे राशन दुकान कोलंबस सहकारी संस्था अंतर्गत होळ येथे कार्यरत आहे. दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्या उपस्थितीत पंचनामा झाला. पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांनी पुरवठा विभागाला अहवाल दिला आहे. एकूण ४४ क्विंटल धान्य जप्त राशनच्या १०८ गोण्या आढळून आले. त्यामध्ये २५ क्विंटल गहू तर १९ क्विंटल राशनचा तांदूळ असे एकूण ४४ क्विंटल धान्य जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.




