ताज्या घडामोडी
बनसारोळा येथील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेत क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी
बनसारोळा (प्रतिनिधी) – क्रांतीसूर्य महात्मा फुलेयांच्या जयंतीनिमित्त जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळा, बनसारोळा येथे दिनांक ११ एप्रिल रोजी विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण शाळा परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मोहिनी शिंदे, उपाध्यक्ष अरविंद गोरे व इतर सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविकात शिक्षकांनी महात्मा फुले यांच्या महान कार्याचा सविस्तर आढावा घेतला. समाजातील अंधश्रद्धा, जातिभेद, सामाजिक अन्याय आणि स्त्रीशिक्षणाच्या अभावाविरुद्ध त्यांनी उभारलेल्या लढ्याची माहिती विद्यार्थ्यांना प्रेरणादायी पद्धतीने सांगण्यात आली. “शिक्षण हेच खरे परिवर्तनाचे साधन आहे” हा त्यांचा मूलभूत संदेश विद्यार्थ्यांच्या मनावर अधोरेखित करण्यात आला. या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अरविंद गोरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित भाषणे, कविता, घोषवाक्ये आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली. कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक बजरंग काकडे, नंदु कावळे, बापू कावळे, अनिल जोगदंड, बापू गोरे, विजय गोरमाळी, राजाभाऊ धायगुडे, लक्ष्मण गोरमाळी, रमेश गोरमाळी, भारत गोरमाळी, मेघराज पाटील, उमेश रोमन, सुधीर रानमारे, मारुती नवघन, आत्माराम खाडे आणि भाऊ जोगदंड आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव व प्रेरणा वाढते, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री मठपती सर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. अशा प्रकारे क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा विद्यार्थ्यांच्या मनात रुजविणारा हा जयंती उत्सव उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला




