आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीय
व्हिएतनाममध्ये चमकलेला अंबाजोगाईचा आदित्य! एशियन चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदकाची कमाई; राजकिशोर पापा मोदी यांच्याकडून सत्कार
अंबाजोगाई (प्रतिनिधी) – अंबाजोगाई शहरातील मंगळवार पेठेतील रहिवासी आणि ऊसतोड मजुराचा मुलगा असलेला अवघ्या १७ वर्षांचा चि. आदित्य दिलीप जाधव याने व्हिएतनाम येथे पार पडलेल्या एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत ४८ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावून संपूर्ण अंबाजोगाई शहराचा आणि भारत देशाचा गौरव वाढविला आहे. आदित्यची ही प्रेरणादायी कामगिरी लक्षात घेता अंबाजोगाई नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मा. राजकिशोर पापा मोदी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. आदित्यच्या पुढील वाटचालीसाठी मोदी यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी म्हणाले, "अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून संघर्ष करत आदित्यने मिळवलेले हे यश केवळ अंबाजोगाईसाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. त्याची जिद्द आणि चिकाटी ही आजच्या तरुणाईसाठी आदर्श ठरणारी आहे." आदित्यच्या यशामुळे अंबाजोगाई शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याची मेहनत, समर्पण आणि क्रीडाप्रेम निश्चितच अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे ठरणार आहे.
