आपला जिल्हाकृषीमहाराष्ट्र
बी.टेक. (कृषी अभियांत्रिकी): विद्यार्थ्यांसाठी करिअरचा नवा मार्ग
भारत हा कृषिप्रधान देश आहे. परंतु आजही शेती व्यवसाय हा शाश्वत नाही. शेतीला शाश्वत करण्यासाठी शेतीचे आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठीच कृषी अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण हा एक उत्तम पर्याय होऊ शकतो. या क्षेत्रामध्ये विविध यंत्रे, पीक लागवडीपासून ते प्रक्रिया सोबतच पॅकिंग पासून ते मार्केटिंगपर्यंतेचे सर्व टप्पे सामावले आहेत. प्रवेश प्रक्रिया/पात्रता : बारावीनंतर बी.टेक. (कृषी अभियांत्रिकी) हा चार वर्षांचा अभ्यासक्रम एकूण ८ सत्रांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. सदर अभ्यासक्रम १८३ क्रेडिट्चा असून अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर बी.टेक. कृषी अभियांत्रिकी पदवी मिळते. या अंतर्गत कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान या विद्याशाखेचा अभ्यास विद्यार्थ्यास करता येतो. विविध कृषी विद्यापीठांतर्गत हा अभ्यासक्रम राबविण्यात येतो. अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी बारावीमध्ये विज्ञान शाखेतून उत्तीर्ण होऊन एमएचटी-सीईटी/जेईई या सामाईक प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक आहे. खुल्या प्रवर्गासाठी किमान ५० टक्के आणि मागास प्रवर्गासाठी किमान ४० टक्के गुणांनी विद्यार्थी उत्तीर्ण झालेला असावा. राज्यातील ४ कृषी विद्यापीठांमध्ये ५ शासकीय आणि १५ विनाअनुदानित महाविद्यालये आहेत. त्यापैकी शासकीय महाविद्यालयामध्ये ३०४, तर विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये ८८० इतकी विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. करिअर संधी : अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विविध उद्योगांमध्ये तसेच विविध केंद्रीय आणि राज्यस्तरीय संशोधन संस्थांमध्ये वैज्ञानिक म्हणून नोकरीच्या संधी आहेत. कृषी अभियांत्रिकी शाखेमध्ये कृषी यंत्रे व शक्ती, अन्न प्रक्रिया व तंत्रज्ञान जलसिंचन व निचरा, मृदा व जलसंधारण आणि अपारंपरिक ऊर्जा असे प्रमुख विभाग आहेत. अन्न प्रक्रिया व तंत्रज्ञान विभागामध्ये विविध अन्नपदार्थांची प्रक्रिया, हाताळणी, साठवणूक, संवर्धन, नियंत्रण, पॅकेजिंग आणि वितरण आदी बाबींचा समावेश होतो. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अन्नपदार्थांचे निर्जंतुकीकरण, निर्जलीकरण, साठवण कालावधी वाढविणे तसेच पोषक घटकांचे जतन, संरक्षणात्मक पॅकेजिंग, कॅनिंग इ.च्या माध्यमातून अन्नपदार्थांचे मूल्यवर्धन करता येते. पारंपरिक पद्धतींच्या तुलनेत नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या वापरातून उत्पादन खर्च कमी करून अन्नपदार्थांची दीर्घकाळ साठवण करणे शक्य होते. अन्नप्रक्रिया उद्योगातील विविध खासगी कंपन्यांमध्ये तज्ज्ञ आणि कुशल मनुष्यबळाची गरज दिवसेंदिवस वाढते आहे. त्याचअनुषंगाने कृषी अभियांत्रिकी अंतर्गत अन्नप्रक्रिया व तंत्रज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना विविध करिअर संधी उपलब्ध आहेत. रोजगाराच्या संधी : अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना खासगी क्षेत्रासह सरकारी क्षेत्रातही रोजगाराच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. कृषी आस्थापना, सरकारी व निमसरकारी आणि सहकारी आस्थापना, केंद्रीय कृषी आस्थापना, अन्न व औषध प्रशासन (फूड इन्स्पेक्टर), भारतीय खाद्य निगम, तसेच फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, बँक व विमा क्षेत्र इ. क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. केंद्रीय व राज्यस्तरीय संस्थामध्ये कृषी शास्रज्ञ, कृषी विद्यापीठे व कृषी विज्ञान केंद्र, केंद्रीय व राज्यस्तरीय कृषी व संलग्न विभाग, कृषी प्रक्रिया उद्योग, कृषी माल साठवणुकीसाठी शीतकरण, कृषी माल निर्यात व निविष्ठा पुरवठा केंद्र, ॲग्री क्लिनिक व ॲग्री बिझनेस सेंटर, ठिबक व तुषार सिंचन पुरवठा केंद्र, ट्रॅक्टर आणि पॉवर टिलर व कृषी यंत्रे यांची डीलरशिप व ट्रेडिंग, बीज प्रक्रिया व कृषी उद्योग विकास महामंडळ, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, जलसंधारण व पाटबंधारे विभाग इत्यादी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. याशिवाय यूपीएससी, एमपीएससी व स्टाफ सिलेक्शन, बँक व विमा क्षेत्र, पाटबंधारे अधिकारी, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषद, पंचायत समिती, कृषी विभाग या ठिकाणी कृषी अधिकारी, कृषि विस्तार अधिकारी शिवाय वन क्षेत्रपाल, वन संरक्षक, आदी ठिकाणी प्रशासकीय अधिकारी म्हणून संधी आहेत. कृषी सेवा, वनसेवा, नाबार्ड या परीक्षा खास पदवीधरांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा आहेत. एकूणच कृषी क्षेत्रात स्वयंरोजगाराच्या संधीही विपुल आहेत. कल्पकता व कृषी तंत्रज्ञानाच्या आधारे कृषी उत्पादन, अन्नधान्य प्रक्रिया उद्योग, आयात-निर्यात इत्यादी व्यवसायांमध्ये कृषी अभियंते स्वतःचे वेगळी निर्माण करू शकतात. त्याचप्रमाणे विविध कृषी अवजारे, ट्रॅक्टर, यंत्रे यांचे उत्पादन किंवा डीलरशिप व ट्रेडिंग, प्रक्रिया उद्योग उभारणी, कृषी माल साठवणूक, बायोगॅस निर्मित्ती, पवनऊर्जा, शीतकरण सेवा, कृषी माल निर्यात, कृषी निविष्ठा पुरवठा केंद्र, हरितगृह, पॉलिहाऊस, शेडनेट उभारणी, आधुनिक गोठा, कुक्कुटपालनगृह उभारणी यामध्येही भरपूर प्रमाणात संधी आहेत. लेखक : प्रा. गाडगे नरेंद्र गजानन, मो. क्र.: ७२६४९५११९२ हे श्रमशक्ती कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, मालदाड येथे सहायक प्राध्यापक आहेत
