आपला जिल्हा
शालेय सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेला 17 जुलैपासून सुरवात
बीड, दिनांक 04 (जिमाका) आंतरराष्ट्रीय सुब्रतो कप फुटबॉल स्पर्धेत आशियातील विविध देशांतील विद्यार्थी भाग घेतात, ज्यामुळे ही स्पर्धा शालेय स्तरावरील सर्वात उल्लेखनीय फुटबॉल स्पर्धा आहे. सन 2025-26 या वर्षात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड मार्फत जिल्हा क्रीडा संकुल, बीड येथे 17 ते 18 जुलै 2025 या कालावधीत जिल्हास्तर शालेय सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेने 2025-26 मधील शालेय क्रीडा स्पर्धांची सुरुवात होणार आहे. सदर स्पर्धा 15 वर्षा खालील मुले व 17 वर्षाखालील मुले व मुली या वयोगटात होत आहेत. 17 जुलै 2025 रोजी 17 वर्षाखालील मुले व मुली तर 18 जुलै 2025 रोजी 15 वर्षाखालील मुले या वयोगटातील स्पर्धा होतील. 17 वर्षाखालील वयोगटातील खेळाडूचा जन्म 01 जानेवारी 2009 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा व 15 वर्षाखालील वयोगटातील खेळाडूचा जन्म 01 जानेवारी 2011 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. स्पर्धेचे प्रवेश आणि प्रवेश शुल्क ऑफलाईन पद्धतीने 16 जुलै 2025 रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत स्वीकारले जाणार आहेत. स्पर्धेतील सामने जिल्हा क्रीडा संकुल, बीडच्या मैदानावर घेण्यात येणार आहेत. जिल्हास्तर स्पर्धेनंतर विभागस्तर आणि राज्यस्तर सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धा घेण्यात येणार आहेत. विभागस्तर शालेय सुब्रतो कप फुटबॉल स्पर्धा ह्या बीड येथे दि. 22 ते 24 जुलै 2025 रोजी जिल्हा क्रीडा संकुल मैदान, बीड येथे होणार आहेत. विभागस्तर स्पर्धेतील वयोगटनिहाय विजयी संघांना राज्यस्तर स्पर्धेत प्रवेश मिळणार आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागापूर्वीच www.subrotocup.in या संकेतस्थळावर खेळाडू व संघाची नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच प्रत्येक सहभागी संघानी रू. 2000/- प्रवेश फी भरलेल्या नोंदणीकृत संघांनाच या स्पर्धेत सहभागी करून घेण्यात येईल. राज्यस्तर स्पर्धेतील विजेत्या संघाला सुब्रतो मुखर्जी स्पोर्टस एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. शालेय सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी कालिदास होसूरकर ( मो.क्र.9421595515) यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केले आहे.
