आपला जिल्हामहाराष्ट्र

राजकिशोर मोदी यांच्या हस्ते भगवान श्री महावीर प्रतिमेचे पूजन; जैन बांधवांना जयंतीनिमित्त शुभेच्छा

अंबाजोगाई (प्रतिनिधी): अहिंसेचा संदेश देणारे आणि जगाला शांततेचा मार्ग दाखवणारे भगवान श्री महावीर यांच्या जयंतीनिमित्त अंबाजोगाई शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. या मिरवणुकीदरम्यान भगवान महावीर यांच्या प्रतिमेस राजकिशोर मोदी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जैन समाजातील बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. या मिरवणुकीत अंबाजोगाईतील जैन समाजातील महिला व पुरुष पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. यावेळी राजकिशोर मोदी यांनी भगवान महावीर यांच्या शिकवणीवर प्रकाश टाकताना सांगितले की, “भगवान महावीर यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात अहिंसा, संयम व आत्मशुद्धीचा प्रचार केला. वयाच्या २१ व्या वर्षी पालकांचे निधन झाल्यानंतर त्यांनी तपस्वी जीवनाचा स्वीकार करत ध्यान व साधनेत स्वतःला झोकून दिले.” मोदी यांनी सांगितले की, “भगवान महावीरांनी अहिंसा हीच खरी शक्ती असल्याचे सिद्ध केले. कोणत्याही प्राणिमात्राविषयी मन, वाणी व कृतीने हिंसा न करणे, हेच त्यांच्या शिकवणीचे मूळ आहे. 'स्वतःला प्रिय वाटणारे प्राण, इतर प्राण्यांना देखील तितकेच प्रिय असतात' हे त्यांनी अधोरेखित केले. म्हणूनच आपण कोणत्याही प्रकारे, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या हिंसा टाळली पाहिजे.” आजच्या काळात राजकीय व सामाजिक दहशतीच्या वातावरणात भगवान महावीरांचे विचार अधिक महत्त्वाचे ठरतात, असे परखड मत मोदी यांनी व्यक्त केले. “प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या अंतःकरणात करुणा, शांती आणि अहिंसेचा भाव जागवला तरच खऱ्या अर्थाने भगवान महावीरांची शिकवण आपण आचरणात आणू शकतो,” असेही ते म्हणाले. जयंतीच्या निमित्ताने शहरात आनंदाचे वातावरण होते. घरोघरी दिवे लावून, भक्तिभावाने व धर्मनिष्ठेने भगवान महावीरांना अभिवादन करण्यात आले.

Spread the love

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!