आपला जिल्हामहाराष्ट्र
अथक परिश्रमाने पूर्ण केले एमबीबीएसचे शिक्षण
बीड, – डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या आणि कठोर मेहनत घेतलेल्या मनीषा शामराव शिंदे या विद्यार्थिनीने एमबीबीएस पदवी मिळवत मोठे यश संपादन केले आहे. तीच्या या उज्ज्वल यशाबद्दल कुटुंब, मित्रपरिवार आणि शिक्षकांकडून तीचे भरभरून कौतुक केले जात आहे. मनीषाने आपल्या शालेय शिक्षणाच्या काळापासूनच वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे ध्येय ठरवले होते. तीने बारावीमध्ये विज्ञान शाखेत उत्तम गुण मिळवून वैद्यकीय प्रवेश परीक्षा (NEET) मध्ये उत्कृष्ट यश मिळवत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव मध्ये प्रवेश मिळवला. तीच्या पाच वर्षांच्या कठोर मेहनती आणि समर्पणामुळे तीने एमबीबीएस अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. तीचे या यशाबद्दल पालक शामराव उत्तमराव शिंदे यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले की, “आमच्या मुलीने डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो. तीने अथक मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.” मनिषाने सांगितले, एमबीबीएस पूर्ण केल्यावर "डॉ." ही उपाधी लागणे ही केवळ एक शैक्षणिक उपलब्धी नसून, ती एक जबाबदारीही आहे. डॉक्टर होण्याचे स्वप्न मी शालेय जीवनापासून पाहत होते. आज ते स्वप्न पूर्ण झाले आहे, याचा अभिमान वाटतो. हा प्रवास सोपा नव्हता, पण इच्छाशक्ती, मेहनत आणि कुटुंबीय व गुरुजनांच्या पाठिंब्यामुळे मी यशस्वी झाले. शालेय शिक्षण संपल्यानंतर मी NEET परीक्षेची तयारी केली. सतत अभ्यास, अपयशावर मात करण्याचा निर्धार आणि योग्य मार्गदर्शन यामुळे मी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवू शकले. एमबीबीएसच्या पहिल्या वर्षी शरीरशास्त्र, जैवरसायनशास्त्र आणि शरीरक्रियाशास्त्र यांचा अभ्यास करताना कठीण वाटले, पण हळूहळू अभ्यासाची गोडी लागली. एमबीबीएस हा अभ्यासक्रम केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून नाही, तर प्रत्यक्ष रुग्णांशी संवाद साधून शिकण्याची संधी यामधून मिळते. हॉस्पिटलमधील क्लिनिकल रोटेशन, इंटर्नशिप आणि रुग्णसेवेचा अनुभव घेताना मी डॉक्टरची खरी जबाबदारी समजून घेतली. अनेकदा थकव्यामुळे मरगळ येत होती, पण रुग्णांचे मनःपूर्वक "धन्यवाद" हेच माझ्या मेहनतीचे फळ होते. माझे स्वप्न केवळ एमबीबीएसपर्यंत मर्यादित नाही. मला पुढे एमडी करून एखाद्या विशिष्ट शाखेत निपुणता मिळवायची आहे. मी ज्या समाजात वाढले, त्याच समाजासाठी काहीतरी करायचे आहे. गरीब व गरजू लोकांसाठी चांगल्या आरोग्यसेवेची सुविधा उपलब्ध करून देणे हे माझे ध्येय आहे. हा संपूर्ण प्रवास मला शिकवणारा ठरला. मी डॉक्टर झाले असले तरी शिक्षण अजून संपलेले नाही. मनीषाने यशाचे श्रेय आई-वडील, शिक्षक, नातेवाईक आणि शिक्षण कार्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य आणि मार्गदर्शन करणाऱ्यांना दिले. तीने सांगितले, “हे यश मी एकटीने मिळवलेले नाही. माझ्या कुटुंबाने मला सतत प्रोत्साहन दिले, शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केले आणि शिक्षण कार्यात अनेकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य व मदतीचा हात दिला. मी माझे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून समाजासाठी "रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा" – या तत्त्वावर मी सदैव कार्यरत राहीन! चांगला डॉक्टर होण्याचा प्रयत्न करणार आहे.” तीला पुढील प्रवासासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या असून, वैद्यकीय क्षेत्रात तीचे भवितव्य उज्ज्वल होवो, अशी प्रार्थना केली जात आहे.
