आपला जिल्हामहाराष्ट्र
दिव्यांगांसाठी ५ टक्के निधी, घरकुल योजना व सफाई कामगारांचे थकीत वेतन तात्काळ द्यावे – प्रहार संघटनेचे अंबाजोगाई नगर परिषदेला निवेदन
अंबाजोगाई भरारी न्युज.(प्रतिनिधी) – दिव्यांग नागरिकांसाठी ५ टक्के निधी तात्काळ प्राप्त करणे, दिव्यांगांसाठी घरकुल योजना लागू करणे तसेच कंत्राटी सफाई कामगारांचे थकीत वेतन तत्काळ देण्यात यावे, या मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने अंबाजोगाई नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या मागण्या तातडीने मान्य न झाल्यास प्रहार स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. प्रहार संघटनेच्या वतीने नगर परिषद मुख्याधिकारी श्रीमती प्रियांका टोंगे यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले. यावेळी अंबाजोगाई शहराध्यक्ष अशोकभाऊ गंडले, जिल्हा उपाध्यक्ष शेख फेरोजभाई, जिल्हा प्रवक्ते शेख मुखिदभाई, जिल्हा समन्वयक अशोकभाऊ सोनवणे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुजित बंटी वेडे, तसेच प्रहार संघटनेचे जेष्ठ नेते मधुकर जाधव आणि अंबाजोगाई शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिव्यांग नागरिक हे समाजाचा महत्त्वाचा घटक असून त्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि कल्याणासाठी शासनाने विविध योजना राबविल्या आहेत. मात्र, अंबाजोगाई नगर परिषदेमार्फत अशा योजनांची अंमलबजावणी होताना अनेक अडथळे येत असून, निधीच्या अभावामुळे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लाभार्थ्यांना योग्य फायदा मिळत नाही. याबाबत वेळोवेळी मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने प्रहार संघटनेने आता तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच, नगर परिषदेअंतर्गत कार्यरत कंत्राटी सफाई कामगारांना मागील अनेक महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. यामुळे त्यांना गंभीर आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या थकीत पगाराचे तात्काळ वितरण व्हावे, अशीही प्रमुख मागणी निवेदनात करण्यात आली आहे. प्रहार संघटना नेहमीच वंचित, दुर्बल आणि उपेक्षित घटकांच्या हक्कांसाठी संघर्ष करत आली आहे. यापुढेही अन्यायकारक व निष्क्रिय प्रशासनाविरोधात लढा देत राहील, असा निर्धार यावेळी करण्यात आला.
