आपला जिल्हासंपादकीय
मनोरंजनाच्या नशेत हरवलेली तरुण पिढी? – एक सामाजिक वास्तवाचा वेध
लेखक.संपादक.उत्तरेश्वर शिंदे. आजच्या डिजिटल युगात तरुणाईसाठी मोबाईल ही जीवनावश्यक गोष्ट झाली आहे. सोशल मीडियाचे (फेसबुक, युट्युब, इंस्टाग्राम) वाढते आक्रमण पाहता, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि त्यात सतत वाजणाऱ्या रील्स, स्टोरीज, ट्रेंडिंग व्हिडीओ हेच आजचे वास्तव बनले आहे. धाराशिव जिल्ह्यातून सुरू झालेला "बकऱ्याची थाळी" हा खाद्यप्रकार पाहता पाहता सोशल मीडियावर ट्रेंड झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर पसरला. या प्रकारामुळे अनेकांनी हॉटेल व्यवसायात पाऊल टाकले. प्रत्येक जण काहीतरी वेगळं करण्याच्या स्पर्धेत उतरला. कुणी "ढवारा फिश", तर कुणी थेट हॉटेलसमोर बकरी टांगून ग्राहकांचे लक्ष वेधू पाहू लागले. व्यवसायातील नावीन्यता चांगली, पण त्यामागे केवळ प्रसिद्धीची हाव दिसून येते. या प्रसिद्धीच्या मागे काही इंस्टा स्टार्सही उतरले. काहींनी तर रात्र-रात्र टॉर्च लावून पाण्याच्या ग्लासमध्ये हळद मिसळून 'रेल्वे स्टाईल' म्युझिकसह खास व्हिडीओ बनवायला सुरुवात केली. त्यातून काहींच्या फॉलोअर्स वाढले, काहींनी थोडी कमाईही केली – पण खरंच हा मार्ग यशाचा आहे का? या गोष्टींची गंमत वाटू शकते, पण यामागे एक गंभीर प्रश्न लपलेला आहे. आपली तरुण पिढी कुठे निघाली आहे? आज मुली असोत वा मुले – मोबाईलच्या स्क्रीनमध्येच हरवले आहेत. कधी शिजवणाऱ्या स्वयंपाकघरात असाव्या लागणाऱ्या मुली, त्या मोबाईलवर ट्रेंडिंग रील्स करताना दिसतात. फेसबुक, इंस्टा, युट्युब हेच त्यांचे व्यासपीठ झाले आहे. रील्स, लाइक्स आणि कमेंट्सच्या या आभासी जगात त्यांना खरे जीवन, कौशल्य आणि कर्तृत्व विसरत चालले आहे. बेरोजगारी, दिशाभूल आणि सोशल मीडियावरून मिळणारे क्षणिक यश – या तिन्हीचा आजच्या पिढीवर खोल परिणाम होत आहे. शिक्षण, मेहनत, कौशल्य, व्यवसायाची नीती – हे सगळं बाजूला पडून फक्त व्हायरल होण्याची धावपळ सुरू आहे. तरुण पिढीने बोध घ्यावा का? हो, मनोरंजन हवेच – पण त्याबरोबर जबाबदारीची जाणीवही हवी. सोशल मीडियाचा उपयोग स्वतःला घडवण्यासाठी, नवे काही शिकण्यासाठी केला पाहिजे. केवळ दिखावा, ट्रेंडिंग व्हिडीओ, प्रसिद्धीचा हव्यास – यामुळे दीर्घकालीन यश मिळणार नाही. आजच्या पिढीने विचार करावा लागेल – “रेल्वेचा आवाज करू की स्वतःच्या जीवनात यशाचा मार्ग शोधू?”
