आंतरराष्ट्रीय खेळाडू साधना भोसले हिला “भीम प्रतिष्ठान”चा राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार….!

सोलापूर : येथील आंतरराष्ट्रीय बेसबॉल खेळाडू कु. साधना लक्ष्मण भोसले हिला “भीम प्रतिष्ठान”चा राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. “भीम प्रतिष्ठान”च्या पुरस्काराचे हे 23 वे वर्ष आहे. या पुरस्कारांमध्ये पहिल्यांदाच क्रीडा पुरस्काराचा समावेश करण्यात आला असून पहिल्या क्रीडा पुरस्काराची ती मानकरी ठरली आहे. 2 एप्रिल रोजी शिवस्मारक सभागृह येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.
चीनमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत साधनाने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. राष्ट्रीय व राज्य स्पर्धेतही तिने अनेक पुरस्कार पटकावले आहेत. क्रीडा कार्यालयातर्फे देण्यात येणाऱ्या “जिल्हा क्रीडा पुरस्कारा”चीही ती मानकरी ठरलेली आहे. सामाजिक कार्यकर्त्या कल्पना भोसले यांची ती कन्या आहे. भीम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाबा बाबरे, अध्यक्ष वीरेंद्र हिंगमिरे यांच्यासह अनेकांनी साधनाचे अभिनंदन केले असून या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.