ताज्या घडामोडी

अंबाजोगाईत पोलिसांचा मोठा दणका; १३ लाखांच्या गांजासह चारचाकी जप्त, चौघांवर गुन्हा दाखल

भरारी न्युज| बीड : बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यात सुरू केलेल्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठे यश आले आहे. अंबाजोगाई शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) संयुक्त कारवाई करत सटवाजी नगर भागात एका चारचाकी गाडीतून नेला जाणारा तब्बल १३ लाख ७० हजार ८६० रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून त्याच्या इतर तीन साथीदारांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, अंबाजोगाई येथील ड्रिमसिटी (सटवाजी नगर) परिसरात एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून गांजाची अवैध वाहतूक होणार आहे. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचला. संशयास्पद पांढऱ्या गाडीची झडती घेतली असता, त्यात दोन निळ्या रंगाच्या प्लास्टिक गोण्यांमध्ये २८ किलो गांजा मिळून आला. पोलिसांनी गांजा आणि वाहतुकीसाठी वापरलेले वाहन असा एकूण १३,७०,८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८३/२०२६ अन्वये NDPS कायद्याच्या कलम ८(सी) आणि २० नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. १. प्रतीम राम तरकसे (वय २७, रा. आडस, ता. केज) - याला ताब्यात घेण्यात आले आहे.२. प्रतिक भगवान पाटोले (रा. आसरडोह, ता. धारूर).३. अजय पाटोळे (रा. आसरडोह, ता. धारूर).४. अजय देवकर (रा. अंदोरा, ता. कळंब, जि. धाराशिव). या आरोपींचा समावेश आहे. ही धडक कारवाई बीडचे पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, अंबाजोगाई शहरचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, पीएसआय सुशांत सुतळे, पीएसआय शिंदे यांच्यासह मारुती कांबळे, रामचंद्र केकाण, सुनील अलगट, गोविंद भताने, सचिन आंधळे, अतुल हराळे आणि शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी वडकर, गायकवाड, वाहुळे, चादर व खरटमोल यांचा सहभाग होता. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद जोगदंड करत आहेत.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!