ताज्या घडामोडी

SRTR ग्रामीण रुग्णालयातील निष्काळजीपणामुळे नवजात बाळाचा मृत्यू; दोषी डॉक्टरांवर कारवाईची मागणी

अंबाजोगाई (प्रतिनिधी) स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय रुग्णालय, अंबाजोगाई येथे डॉक्टरांच्या गंभीर हलगर्जीपणामुळे नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी सौ. प्रतिक्षा रोडे यांच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला असून, सर्व वैद्यकीय अहवाल (रिपोर्ट) नॉर्मल असतानाही प्रसूतीदरम्यान आवश्यक ती काळजी न घेतल्याचा आरोप नातेवाईक व सामाजिक संघटनांकडून करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सौ. प्रतिक्षा रोडे यांना दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी प्रसूतीसाठी SRTR रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या अहवालानुसार त्यांची प्रकृती स्थिर असून सर्व तपासण्या सामान्य होत्या. मात्र प्रसूतीच्या वेळी संबंधित डॉक्टरांनी तत्पर व योग्य उपचार न केल्यामुळे नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेमुळे शहरासह परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी बहुजन विकास मोर्चाचे नेते बाबुरावजी पोटभरे यांच्या वतीने तसेच जाती अंत संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य (कॉम्रेड बब्रुवाहन पोटभरे) यांच्या वतीने रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. निवेदनात गायनिक विभागाचे प्रमुख (HOD) डॉ. गणेश तोडगे तसेच दि. २७/१२/२०२५ रोजी प्रसूती कक्षात ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच यापूर्वी दि. १३/०७/२०२५ रोजी होळ (ता. केज, जि. बीड) येथील एका महिलेच्या नवजात बाळाला मृत घोषित केल्याच्या प्रकरणाचीही सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय SRTR रुग्णालयाचे निष्क्रिय अभ्यागत मंडळ तात्काळ बरखास्त करावे आणि सदर बाळ मृत्यू प्रकरणाची चौकशी रुग्णालयाबाहेरील स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी व निवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून करावी, अशीही ठाम मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना विनोद सुभाष शिंदे, अविनाश कुऱ्हाडे, आवाडे रवी, बाबा शेख, बब्बू शेख, प्रेम माने, मनीष आदमाने, युसूफ शेख यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. दोषींवर तातडीने कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!