ताज्या घडामोडी
होळ गावातील स्मशानभूमीची दयनीय अवस्था; ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संताप
होळ | प्रतिनिधी होळ गावातील मांग व बौद्ध समाजासाठी असलेल्या एकमेव स्मशानभूमीची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गावाच्या कडेला असलेल्या या स्मशानभूमीकडे ग्रामपंचायतीचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असल्याचे वास्तव समोर आले आहे. या स्मशानभूमीत पाण्याची कोणतीही सोय नसून, जरी बोअरवेल खोदण्यात आले असले तरी त्यावर मोटार बसवण्यात आलेली नाही. त्यामुळे अंत्यविधीच्या वेळी पाण्यासाठी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्याचप्रमाणे, रात्रीच्या वेळी अंत्यविधी करावा लागल्यास तेथे प्रकाशाची कोणतीही व्यवस्था नसल्याने नागरिकांना अंधारातच विधी पार पाडावे लागत आहेत. विशेष म्हणजे, गावात कुणाचाही मृत्यू ठराविक वेळेला होत नाही. कधी दिवसाच्या वेळेस, तर कधी रात्री उशिरा अंत्यविधी करावा लागतो. अशा वेळी इतर गावांमध्ये स्मशानभूमीत लाईट, पाणी व बसण्याची सोय असते. मात्र होळ गावातील दलित व बौद्ध समाजासाठी असलेल्या स्मशानभूमीकडे ग्रामपंचायतीने पूर्णपणे पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. सदर स्मशानभूमी केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या कार्यकाळात, तसेच माजी सरपंच उत्तम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे उभारण्यात आली होती. मात्र, त्यानंतरच्या काळात ग्रामपंचायतीकडून कोणतीही देखभाल-दुरुस्ती करण्यात आलेली नाही. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून, साफसफाईचा पूर्ण अभाव आहे. नुकत्याच एका अंत्यविधीच्या वेळी नागरिकांना दुचाकी वाहनांच्या लाईटच्या उजेडात अंत्यसंस्कार करावे लागले, ही बाब अत्यंत गंभीर असून प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे जिवंत उदाहरण ठरते. गावात रस्त्यांचे डांबरीकरण, दुरुस्ती अशा कामांवर भर दिला जात असताना, जीवनातील अंतिम सत्य असलेल्या अंत्यविधी व्यवस्थेकडे मात्र ग्रामपंचायत पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. बौद्ध व मातंग समाजाच्या वतीने ग्रामपंचायतीकडे जोरदार मागणी करण्यात येत आहे की, तात्काळ स्मशानभूमीत पाण्याची व्यवस्था, विद्युत पुरवठा, साफसफाई आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल,




