ताज्या घडामोडी
सामाजिक उपक्रमांनी विष्णू घुले यांचा वाढदिवस साजरा नरसिंह मंदिरात आरती, स्वच्छता मोहीम, वृक्ष लागवड, शैक्षणिक साहित्य वाटप
केज (प्रतिनिधी) दि.१० : केज पंचायत समितीचे सभापती विष्णू घुले यांचा वाढदिवस यंदा सामाजिक सेवेद्वारे अनोख्या पद्धतीने शुक्रवारी (दि.१०) साजरा करण्यात आला. सर्वत्र अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांना आलेल्या संकटाची जाणीव ठेवून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. लोकनेत्या, राज्याच्या पर्यावरण तथा पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे, मा.खा. डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णू घुले हे सक्रियपणे राजकारण, समाजकारण करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त केज तालुक्यातील तरनळी येथील सुप्रसिद्ध श्री नरसिंह मंदिरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांना आलेले नुकसान दूर व्हावे, ही प्रार्थना करत श्री नरसिंह देवाची आरती करण्यात आली. त्यानंतर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविली गेली आणि परिसरात वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला गेला. या उपक्रमात कार्यकर्ते व नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेत मंदिर परिसर स्वच्छ करण्यास हातभार लावला. “स्वच्छ भारत अभियान” या संकल्पनेला बळकटी देत स्वच्छतेचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. तरनळी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना फराळाची व्यवस्था करण्यात आली, तर उमरी येथील मूकबधिर शाळा, डोनगाव येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, खाऊ वाटप करण्यात आले. अनेक कार्यकर्ते व नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. यावेळी पंचक्रोशीतील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभापती विष्णू घुले यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या या सामाजिक सेवा आणि पर्यावरण संवर्धन उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या कार्यामुळे समाजासाठी आदर्श घालून दिला गेला आहे.




