आपला जिल्हाताज्या घडामोडी
*आदर्श शिक्षक भागवत मसने लोकशाहीर अण्णाभाऊ राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने सन्मानित* *शाहू नगरीत मोठ्या उत्साहात रंगला सन्मान सोहळा*
अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- आदर्श शिक्षक व उत्कृष्ठ संवादक, वक्ता असलेले बीड जिल्ह्यातील भागवत रामकृष्ण मसने यांना मानवतावादी संस्कृतिक चळवळ आणि धम्म भवन चारिटेबल ट्रस्ट कोल्हापूर यांच्यातीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती निमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. रविवार दि ३ ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे राज्याचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शानदार सोहळ्यात पुरस्काराचे वितरण करण्यात आले.यावेळी आमदार राजीव आवळे, उत्तम दादा कांबळे (जिल्हाध्यक्ष,आर.पी.आय. रामदास आठवले गट कोल्हापूर) , तसेच समितीच्या प्रमुख अंकिता कोल्हापूरकर , प्राध्यापक कुराडे, डॉक्टर श्रीपाद देसाई, ऍड करुणा विमल हे प्रामुख्याने उपस्थित होते. लोकशाहीर अण्णाभाऊ सन्मान चिन्ह , लोकराजा राजर्षी शाहू महाराज सन्मानचिन्ह व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील पुस्तक देऊन मसने सन्मानित करण्यात आले. मानवतावादी सांस्कृतिक चळवळ धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर, यांच्यावतीने कला साहित्य, संस्कृती, शिक्षण, आरोग्य, राजकारण, समाजकारण, आणि विविध जनसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ राष्ट्रीय सन्मान पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते दरवर्षी सन्मानित केले जाते. त्या अनुषंगाने मे व जून महिन्यात असे कार्य करणाऱ्यांचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्या दृष्टीने कला,साहित्य, शिक्षण व राजकारणावरील वात्रटिका व सांस्कृतिक क्षेत्रात आज पर्यंत भागवत मसने सहशिक्षक श्री योगेश्वरी नूतन विद्यालय यांनी जे कार्य केले त्याचे सर्व पत्र, स्वलिखित पथनाट्याचे व्हिडिओ, स्वलिखित गाण्याचे व्हिडिओ, तसेच अनेक कवी संमेलनाचे व्हिडिओ सूत्र संचालनाच्या क्लिप आदी दस्तऐवज यासाठी पाठवले होते. त्यांनी पाठवलेल्या साहित्याची दखल व त्यांच्या सर्व कार्याची दखल घेऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार २०२५ भागवत मसने यांना जाहीर करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण येत्या ३ऑगस्ट २०२५ रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे करण्यात आले. मसने सरांनी यापूर्वीही महाविद्यालयीन जीवनापासूनच वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेत सहभागी होवून अनेक जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धेत पारितोषिके मिळविली आहेत. मराठवाडा विभागीय स्तरावरील स्पर्धेतील पहिले बक्षीस ३० डिसेंबर १९८९ साली खोलेश्वर महाविद्यालयात बारावी मध्ये शिक्षक असताना के. के. एम. कॉलेज मानवत मध्ये पटकविले त्यानंतर पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेत अनेक स्पर्धा गाजविल्या आहेत. स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयातून नाट्यशास्त्र विषयातील पदवीचे शिक्षण घेत असतांना वाद विवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धामध्ये व्यक्तिगत ३२ हून अधिक बक्षीसे मिळवली आहेत. तर सांघिक बक्षिसांच्या ढाली स्वामी रामानंद महाविद्यालयाला प्राप्त करून दिल्या आहेत. तासिका तत्त्वावर श्री. योगेश्वरी महाविद्यालयामध्ये वरिष्ठ स्तरावर प्राध्यापक म्हणून काम करीत असतांना सात वर्षात अनेक विद्यार्थी वक्तृत्व वादविवाद स्पर्धेत घडवले. त्यानंतर नोव्हेंबर २००२ मध्ये श्री. योगेश्वरी नूतन विद्यालय या ठिकाणी रुजू झाल्यानंतर अनेक विद्यार्थी घडविण्याबरोबरच पाच एकांकिका व पाच गीते लिहून विद्यालयाच्या विद्यार्थी चमूद्वारे बीड आकाशवाणी केंद्रीवर सादर केल्या आहेत. तसेच अनेक वर्षापासून एक ते दीड तासाचा हास्य व्यंगात्मक कार्यक्रम अनेक महाविद्यालयामध्ये सादर केला आहे. याबरोबरच विविध ठिकाणी वाद-विवाद वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण केले. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रामध्ये योगदान देण्याचे काम भागवत मसने यांनी केले आहे. या त्यांच्या शैक्षणिक कार्यातील योगदाबादल गेल्यावर्षी मैत्रा फाउंडेशन बीड तर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने स्मनानित करण्यात आले आहे. तर दैनिक शिवजागर व विश्वनाथ फाउंडेशन पुणे यांच्यावतीने यांना आदर्श शिक्षक व साहित्यक पुरस्काराने 'महाराष्ट्र रत्न' म्हणून गौरविण्यात आले. त्यांच्या या एकूणच शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन कोल्हापूर येथील शाहू नगरीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न हा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने भागवत मसने यांना विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानीत करण्यात आले. भागवत मसने याना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे राजकीय, सामाजीक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षाव केला जात आहे.




