आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र
बॅनर एजन्सींचा बेकायदेशीर कारभार – प्रशासन डोळेझाक का करतंय?
अंबाजोगाई शहरात सध्या चौका-चौकात मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स आणि बॅनर्स लावले जात आहेत. जयंती, उद्घाटन, शुभेच्छा अशा विविध निमित्तांनी लावले जाणारे हे बॅनर पाहता, त्यामागे कार्यरत असलेली यंत्रणा किती धोकादायक परिस्थितीत काम करते, हे अनेकांना माहितीच नसते. शहरातील बॅनर एजन्सीज आपल्या कामगारांचा जीव धोक्यात घालून हे फ्लेक्स उंच जागांवर लावत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात अलीकडेच दोन युवकांनी पावसाळ्याच्या दिवसांत, लाईटच्या तारा अगदी डोक्याजवळ असतानाही, कोणतीही सुरक्षा नसताना बॅनर लावले. ही बाब अतिशय गंभीर असून, त्यातून अपघात होण्याचा धोका सदैव असतो. अशा धोकादायक कामासाठी या एजन्सीकडील कामगारांना केवळ मोबदला दिला जातो, परंतु कोणतीही विमा सुरक्षा दिली जात नाही. विशेष म्हणजे, हे बॅनर लावताना कोणतीही शासकीय परवानगी घेतली गेली आहे का, याची शहानिशा एजन्सी करत नाही. प्रशासनाने देखील अशा बॅनर लावण्यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही, जे अत्यंत गंभीर आणि निष्काळजीपणाचे द्योतक आहे. प्रश्न असा आहे की, बॅनर लावण्यासाठी संबंधित व्यक्तीकडून परवानगी घेण्याची जबाबदारी एजन्सीची नाही का? तसेच, लाईटच्या खांबांवर, तारा असलेल्या ठिकाणी बॅनर लावण्यास मनाई असतानाही असे बॅनर कोणाच्या परवानगीने लावले जात आहेत? या बॅनर एजन्सींवर प्रशासन कारवाई करेल का? की त्या एजन्सींकडून आर्थिक मोबदला घेऊन डोळेझाक केली जाते? ही परिस्थिती सामान्य नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि तरुणांच्या जीवाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे.




