आपला जिल्हामहाराष्ट्रसंपादकीय
सुशीलाताई, मराठा समाजाला तुमचा आदरच आहे व पुढेही राहील…. पण…!
आदरणीय सुशीलाताई, नमस्कार.... लाल सलाम! आपण बीड जिल्ह्याच्या पुरोगामी क्षेत्रात राजकीय व सामाजिक विचारपीठावरून गेली कांही दशके सक्रिय असणाऱ्या महिला नेत्या आहात.... आपल्यासारख्या महिला नेत्या तयार होण्यासाठी खूप मोठा काळ गेलेला आहे.निर्भीडपणे डाव्या विचारांना स्वीकारून ते जिवंत ठेवण्यासाठी आपण केलेले कार्य महत्वाचे आहे. यामुळेच आपण कोणा एका समाजाच्या नव्हत्या व नाहीत... सर्वच बहुजन समाज ज्या कांही थोडक्या लोकांना त्यांच्या जातीधर्मा बाहेर त्यांच्या विचार, आचार व कार्यामुळे आपले मानून वेगळे सन्मानाचे स्थान देत असतो. अशा लोकांबद्दल सर्वच समाजात वेगळे स्थान असतें. आपल्या वंजारी समाज मेळाव्यात आपण व्यक्त केलेल्या विचारांनंतर गेली दोन-चार दिवसांपासून आपल्याबद्दल होत असणाऱ्या टिप्पणी नक्कीच योग्य नाहीत. छत्रपती शिवरायांच्या विचार-कार्याची शिकवण व प्रभाव असणारा मराठा-बहुजन समाज महिला नेत्याबद्दल केलेल्या चुकीच्या व खालच्या पातळीवरील प्रतिक्रियेशी मुळीच सहमत नाही. अशा प्रतिक्रियांचा निषेधच! सोसिअल मीडियावर अशा चुकीच्या पद्धतीने व्यक्त होणारे केवळ मराठा समाजातच आहेत असे नाही इतरही सर्वच बहुजन जाती धर्मात हे नेटवर्क काम करत आहे. सुशीलाताई आपण जरा चुकलातच.... ताई, बहुजन समाज खूप मोठा आहे. विविध जाती व कांही धर्म अशा विशाल स्वरूपात आपला समाज विस्तारलेला आहे. आजच्या बदलत्या काळात सर्वच जातींचे आपापले प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी 'जात' नावाखाली कोणताही समाज एकत्र येत असेल तर याबद्दल कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. आपण ही वंजारी समाजाच्या मेळाव्यात गेलात याबद्दल कोणालाही आक्षेप नसावा. मात्र आम्हाला वाटते या मेळाव्यात आपण उपस्थित राहण्याची वेळ व उपस्थित राहून व्यक्त होण्याची पद्धत चुकली आहे. 'वेळ' यासाठी कि या मेळाव्यात वंजारी समाजाच्या प्रश्नावर चर्चा होण्यापेक्षा मराठा-वंजारी व 'राजकीय वर्चस्ववाद' याच विषयावर रोख होता. संतोष देशमुख हत्याकांड महाराष्ट्रभर गाजले. सध्या ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड व माजी मंत्री- आमदार धनंजय मुंडे साहेब यांचे संबंध किमान बीड जिल्ह्याच्या रहिवाशी व राजकीय अभ्यासक म्हणून आपणाला माहीत आहेत. ते दोषी असोत कि नसोत.परंतु आज हे प्रकरण संवेदनशील असताना व न्यायालयात प्रकरण सुरु असताना आपण आमदार धनंजय मुंडे साहेबांचे समाजाच्या विचारपीठावरून थेट समर्थन करणे मराठा समाजाला पटले नाही. जेंव्हा कि गेली कांही दिवस मराठा -वंजारी समाजात समज-गैरसमजातून निर्माण झालेली दरी कमी करण्यासाठी दोन्ही समाजातील बुद्धिजीवी लोक प्रयत्नशील आहेत. अशा वेळी ज्या समाजाच्या मनात 'सुशीलाताई' नेहमी जातीय मंचावर तटस्थ व पुरोगामी आहेत असे वाटते त्यांनी अचानक आवेशपूर्ण भाषणात सरळ मराठा समाज व त्याच्या कुणबीपणावर बोलताना आव्हाननात्मक भाषा वापरताना पाहिले. केवळ इतकेच नाही तर आवाहानात्मक भाषा ऐकली त्यावेळी केवळ संपूर्ण मराठा समाजच नव्हे तर आपला बहुजन समाजही अवाक झाला. आपण ओघात व समाजापुढे बोलताना बोलून गेलात. ताई, 'आपण सहज व लोकशाहीने दिलेल्या अधिकारात बोललो' हे आपलं म्हणणं खरं असलं तरी ज्या मराठा समाजाला सुशीलाताई बद्दल वेगळा आदर आहे त्या समाजाला त्याच्याबद्दल आपलं असं बोलणं आवडलं नसावं. कारण लक्षात असू द्या 'जवळच्या व्यक्तीने केलेला घाव जास्त वेदनादायी असतो'. आपण प्राध्यापिका आहात. आपण शेक्स्पिअर वाचला असेल. दूरच्या व अपरिचित व्यक्तीने कितीही घाव घातले तरी ते अपेक्षित असतात मात्र ज्यांना हृद्यात स्थान दिलेले असते त्यांच्या कडून असे घाव घातले गेल्यास ते खूपच वेदनादायी असतात. तीच अवस्था आपल्या भाषणानंतर मराठा समाजाची झाली आहे. त्यामुळेच आपल्याबद्दल कांहीनकारात्मक प्रतिक्रिया उमटलेल्या दिसतात. सामाजिक क्षेत्रात वावरताना आपल्यासारख्या लोकांनी कांही संकेत पाळायलाच हवेत. नसता समाजाने कोणाच्या आशेवर चालायचे? बहुजन समाजातील आपल्यासारख्या कांही व्यक्ती समाजाच्या ऐक्य व बंधुभाव जोपासण्यासाठी शेवटची आशा आहेत. आपल्यासारख्या लोकांकडून समाजाच्या मोठ्या अपेक्षा असताना आमच्या चुका परवडणाऱ्या नाहीत. मराठा युवकांनो आव्हान सकारात्मक घ्या... मराठा समाज बहुजनातील सर्वात मोठा समाजघटक आहे. त्यामुळे समाजाच्या समस्याही तितक्याच अधिक आहेत. बदलत्या काळात त्यात आणखीच भर पडली आहे. त्यामुळे समाज यातून बाहेर पडण्यासाठी वाटा शोधत आहे. संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अराजकीय व प्रामाणिक आंदोलनाने मराठा समाजाची मने जिंकली आहेत. हे आंदोलनही कांही प्रमाणात समाजाला नवीन संधीची आशा वाटत आहे. इतर समाज बांधव जरांगे पाटील यांच्या आंदोलनात 'जात' दिसत असली तरी समाजाला हे आंदोलन भविष्यातील नोकरीची एक मोठी संधी वाटते. मनोज जरांगे पाटील यांच्याकडून कळत नकळत इतर समाजाच्या नेत्यांबद्दल सुशीलाताई प्रमाणे आवेशात कांही शब्द गेले असतील परंतु आज मराठा समाजाने कोणत्याही राजकीय नेत्याचे उदात्तीकरण अथवा गुलामगिरी न स्वीकारता एका प्रामाणिकपणा सिद्ध केलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या अत्यंत सामान्य व्यक्तीच्या मागे उभा आहे. जरांगे पाटील यांचा हा लढा मोठ्या प्रमाणात यशस्वीही झाला आहे. मराठा युवकांच्या समोर अनेक समस्या आहेत. यातील कांही समस्या शासन किंवा प्रशासनाच्या हातात असल्या तरी शिक्षण, रोजगार, व्यसनाधीनता यासारख्या अनेक समस्यांचे निर्मूलन समाजाला स्वतः करायचे आहे. आजही मराठा समाजात शांत न बसू देणाऱ्या दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अभाव आहे. व्यसनाधिनतेचे प्रमाण मोठे आहे. अंधश्रद्धा व कर्मकांडाचा पगडाही कमी नाही. काम करण्याची लाज वाटणारेही मोठया प्रमाणात आहेत. समाजाच्या लोकसंख्येप्रमाणेच विविध राजकीय पक्षात सतरंज्या उचलणाऱ्यांची संख्या ही याच समाजाची सर्वाधिक आहे. बहुजन समाजातील इतर 'जाती समुह' कोणत्यातरी एका पक्षाचे वोटबँक बनले आहेत मात्र एकमेव मराठा समाज आहे जो महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्षाचा आधार बनलेला आहे. या सर्व ओझ्यांचे गाठोडे डोक्यावर घेऊन पुढे गेल्यास आम्हाला कोणीच तारू शकणार नाही. शिक्षण घेतले तर आरक्षणाचा लाभ घेता येईल. शिक्षणच जर अर्धवट, दर्जाहीन व गुणवत्तापूर्ण न घेतल्यास पुढील दरवाजे बंद असतील. मराठा समाजात देखील खूप उंचीची माणसे होती, आहेत व पुढेही असणार आहेत. यापुढे स्पर्धेत राहायचे असेल तर नक्कीच "सुशीलाताईचा सल्ला" सकारात्मक घेऊन वाटचाल करा... विचाराची लढाई विचारानेच लढु यात ! हनुमंत भोसले, केज 9423733888
