आपला जिल्हाकृषीताज्या घडामोडीमहाराष्ट्र
प्रमाणित बियाणांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
बीड दि. 29 ( जिमाका ) :- खरीप 2025 हंगामासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण अभियान अंतर्गत भात, तुर, मुग, उडीद, मका, बाजरी, नाचणी, वरई व कापूस तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अंतर्गत - सोयाबीन, सुर्यफुल, भुईमुग, तीळ पिकांच्या अनुदानावरील प्रमाणित बियाणे करिता अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान- अन्नधान्य पिके व वाणिज्यिक पिके आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियान- तेलबिया अंतर्गत पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी व बियाणे बदलाचे महत्व विचारात घेता सुधारित / संकरीत वाणांचे प्रसाराच्या दृष्टीने प्रमाणित बियाणे वितरण व पीक प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या घटकांतर्गत आर्थिक सहाय्य प्रति शेतकरी किमान 0.20 हे ते कमाल 1 हेक्टरपर्यंत मर्यादित आहे. प्रमाणित बियाणे वितरण या घटकाचा लाभ वैयक्तिक शेतक-यांना देण्यात येणार असून सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल व तीळ या पिकांकरिता 100 टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करुन देण्यात येत आहे. याकरिता https:// mahadbt.maharashtra.gov.in/FarmerAgriLogin/AgriLogin या संकेतस्थळावर “बियाणे वितरण, प्रात्यक्षिक,फ्लेक्सी घटक, औषधे आणि खते” या टाईल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील. या घटकाची प्रथम लाभार्थी निवड यादी दि.30 मे 2025 रोजी जाहीर करण्यात येईल.तसेच भात, तुर, मुग, उडीद, मका, बाजरी, नाचणी, वरई या पिकांकरिता अनुदानावर प्रमाणित बियाणे उपलब्ध आहे. शेतक-यांनी 7/12 उता-यासह कोणतेही एक ओळखपत्र बियाणे वितरकाला दाखवून अनुदान वजा जाता लोकवाटा भरुन प्रमाणित बियाणाचा लाभ घ्यावा. प्रमाणित बियाणे घटकास अर्ज सादर करणेसाठी शेतक-यांची Agristack वर नोंदणी असणे बंधनकारक आहे. लाभार्थी निवड प्रथम अर्ज करणा-यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्वावर करण्यात येणार आहे. प्रमाणित बियाणे वितरण या घटकाचा लाभ घेणेसाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी प्रमाणित बियाणे वितरण या घटकाचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.




