आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाईत वंचित बहुजन आघाडीतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ७१ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग, जवानांना अभिवादन करण्याची भावनिक प्रतिक्रिया

अंबाजोगाई (प्रतिनिधी) — वंचित बहुजन आघाडी अंबाजोगाई शहराच्या वतीने ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या शासकीय रक्तपेढीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. दिनांक १० मे रोजी पार पडलेल्या या शिबिरात ७१ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत देशभक्तीची जिवंत भावना व्यक्त केली. या वर्षीचा वाढदिवस साधेपणाने, पण सामाजिक भान जपत साजरा करण्यात आला. अलीकडील भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देशभरातील कार्यकर्त्यांना आवाहन केले होते की, “माझा वाढदिवस केक न कापता, फटाके न फोडता आणि कोणताही जल्लोष टाळून, देशसेवेस समर्पित कार्यातून साजरा करावा.” त्यांच्या या भावनिक आणि जबाबदारीची जाणीव देणाऱ्या आवाहनाला अंबाजोगाईतील कार्यकर्त्यांनी मनापासून प्रतिसाद दिला. शिबिराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, हे रक्तदान केवळ सामाजिक उपक्रम म्हणून नव्हे, तर देशाच्या सीमेवर आपले प्राण पणाला लावून लढणाऱ्या जवानांच्या सन्मानार्थ आणि वीरमरण पत्करलेल्या शहीदांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आले होते. देशाच्या संरक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या वायुदल, नौदल आणि भूदलातील सैनिकांचे मनोबल वाढावे, यासाठी हा उपक्रम एक प्रेरणादायी पाऊल ठरला. या शिबिरात युवकांचा विशेषतः मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला. अनेक युवकांनी पहिल्यांदाच रक्तदानाचा निर्णय घेत, सामाजिक जबाबदारी स्विकारली. पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. विशेषत: बाबासाहेब आचार्य सर आणि मंगेश भोले सर यांनी स्वतः रक्तदान करून इतरांना प्रेरणा दिली. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी वंचित बहुजन आघाडी अंबाजोगाईचे शहराध्यक्ष गोविंद आबा मस्के आणि महासचिव नितीन बप्पा सरवदे यांनी पुढाकार घेतला. त्यांना रणजीत सरवदे, स्वप्निल ओव्हाळ, प्रशांत वेडे, विशाल सरवदे, स्वप्निल हातागळे, प्रशांत होके, जयपाल हातागळे, चंद्रकांत सरवदे, आबासाहेब माने, अमोल बचाटे, शैलेश रोडे, सूरज निकाळजे, विजयकुमार गायकवाड, प्रतिक बनसोडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बालासाहेब सोनवणे सर, वंचितचे शहराध्यक्ष गोविंद मस्के, महासचिव नितीन सरवदे, उपाध्यक्ष रशीदभाई शेख, न्यूज लोकमनचे संपादक संजय जोगदंड, तालुका प्रसिद्धी प्रमुख सतीश सोनवणे, शहर प्रसिद्धी प्रमुख उमेश शिंदे, रिपब्लिकन सेनेचे युवा जिल्हाध्यक्ष अजय गोरे, शहर उपाध्यक्ष अर्जुन वाघमारे यांची उपस्थिती होती. देशसेवा आणि समाजसेवेचा संगम असलेल्या या रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले गेले. अशा प्रकारच्या उपक्रमातून सामाजिक जाणीव दृढ होते तसेच देशभक्तीचा एक नवा आदर्श निर्माण होतो, असे मत यावेळी अनेकांनी व्यक्त केले.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!