आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जयवंती नदीच्या संरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला गालबोट? पत्रकार योगेश डाके यांना पन्नास हजारांची लाच देत आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न, अज्ञात व्यक्तीचा कॉल व्हायरल

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – जयवंती नदीच्या संरक्षणासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून अंबाजोगाई शहरात सुरू असलेले आंदोलन आता निर्णायक वळणावर येताना दिसत आहे. सामाजिक कार्यकर्ते पत्रकार अभिजीत लोमटे यांनी सुरुवातीला नगरपालिकेसमोर उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या माध्यमातून त्यांनी जयवंती नदीतील अतिक्रमण, अडथळे व जबाबदार ठरणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली होती. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तोंडी आश्वासन दिल्यानंतर लोमटे यांनी थेट उपोषण थांबवून त्याऐवजी साखळी उपोषणाची सुरुवात केली. या साखळी उपोषणात शहरातील विविध पत्रकार व नागरिक सहभाग नोंदवत आहेत. या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक प्रकार घडला असून साखळी उपोषणात सहभागी पत्रकार योगेश डाके यांना अज्ञात व्यक्तीने फोन करून थेट ५०,००० हा रुपये देण्याचं आमिष दाखवले आणि उपोषण थांबवण्याची मागणी केली. सदर फोन संभाषणाचा ऑडिओ संपूर्ण अंबाजोगाई शहर व परिसरात व्हायरल झाला असून त्यामुळे खळबळ उडाली आहे. अज्ञात कॉल करणारा नेमका कोण होता? त्याच्या मागे कोणाचे पाठबळ आहे? हे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जर एका पत्रकाराला ५० हजार रुपयांचे आमिष दाखवले जात असेल, तर इतर उपोषणकर्त्यांसाठी त्याहूनही मोठ्या रकमा दिथील अशि शक्यता नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणामुळे अंबाजोगाई नगरपालिकेची भूमिका संशयास्पद बनली आहे. जर आंदोलन करणाऱ्यांना आर्थिक आमिष दाखवून त्यांच्या मागण्या दाबल्या जात असतील, तर सामान्य जनतेसमोर नगरपालिका काय भूमिका घेणार? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. पत्रकारांप्रमाणेच आंदोलनात सहभागी असलेल्या इतर कार्यकर्त्यांनाही गप्प करण्याचे प्रयत्न सुरू आहेत का, याची चौकशी होणे आवश्यक आहे. जयवंती नदीच्या पात्रात झालेली अतिक्रमणे, त्या अतिक्रमणांना कोणत्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली, त्यामागे कोणता दबाव होता, व कोणत्या आर्थिक व्यवहारातून हा नाला खाजगी हातात गेला, याचा पूर्ण तपास होणे अत्यावश्यक आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून केवळ नदीचे शुद्धीकरण नव्हे, तर भ्रष्टाचाराची साखळी उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अंबाजोगाईतील सामान्य नागरिक, पत्रकार, कार्यकर्ते एकत्र येऊन सत्य समोर येईपर्यंत हे आंदोलन थांबवले जाणार नाही, असा निर्धार व्यक्त करत आहेत. यापुढील काळात हे आंदोलन अधिक तीव्र होईल व जयवंती नदीतील अतिक्रमणाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या सर्वांची प्रतिष्ठा व सुरक्षितता याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे ठरणार आहे. नाहीतर एकदा का सत्य जनतेसमोर आले, तर संबंधित अधिकारी व दोषींना अंबाजोगाईत तोंड दाखवायला जागा राहणार नाही.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!