आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रसंपादकीय
अंबाजोगाईत प्लास्टिक बंदी फक्त कागदावर; प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिक आणि जनावरांच्या जीविताला धोका
अंबाजोगाई.भरारी न्युज .. अंबाजोगाई शहरात प्लास्टिक बंदी ही केवळ नावालाच उरली असून, प्रत्यक्षात प्रत्येक बाजारपेठेत, किराणा दुकानात, फळ विक्रेत्यांकडे, तसेच भाजीपाला विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या खुलेआम वापरल्या जात आहेत. शासनाने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातलेली असतानाही स्थानिक प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसून येते. प्लास्टिकचा आरोग्यावर होणारा परिणाम नागरिकांना माहीत असूनही, प्लास्टिकचा वापर टाळला जात नाही. यापिशव्या नंतर रस्त्यांवर, कचराकुंड्यांत फेकल्या जातात, ज्या मोकाट जनावरांच्या पोटात जातात. परिणामी या जनावरांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. गायींसारखी जनावरे शहरात रस्त्यांवर मुक्तपणे फिरताना दिसतात आणि या प्लास्टिक पिशव्या खाऊन त्यांना गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. शहरात अनेक ठिकाणी गायींचे कळप सर्रास रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. या मोकाट जनावरांमुळे वाहनधारकांनाही मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत आहेत. वाहतुकीला अडथळा होतो, अपघाताचे प्रमाण वाढण्याचीही शक्यता आहे. यावरून स्पष्ट होते की, अंबाजोगाई नगरपरिषदेने प्लास्टिक बंदी व मोकाट जनावर नियंत्रण या विषयांवर कुठलीही ठोस कृती केलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नगरपालिकेने त्वरित प्लास्टिक विक्रेते, फळ विक्रेते, भाजीवाले आणि इतर व्यावसायिक यांच्यावर कारवाई करून शहरातील प्लास्टिक वापर पूर्णतः थांबवावा अशी मागणी होत आहे. तसेच मोकाट जनावरांसाठीही योग्य उपाययोजना करून शहरात स्वच्छता व आरोग्याचा प्रश्न मार्गी लावावा, असे आवाहन नागरिक करत आहेत.




