ताज्या घडामोडी
जवळगाव गायरान धारकांचा इशारा – प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आत्मदहनाचा निर्णायक पाऊल?
अंबाजोगाई भरारी न्युज.. जवळगाव येथील गायरान जमिनीचे धारक प्रशासनाच्या सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षाला कंटाळून आत्मदहनाच्या निर्णयाकडे वळले आहेत. गेली चाळीस वर्षे संबंधित जमिनीवर ताबा असूनही शासनाकडून अधिकृत मान्यता न मिळाल्याने या धारकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. गायरान धारकांनी संबंधित पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय अंबाजोगाई, उपजिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगाई, जिल्हाधिकारी कार्यालय बीड तसेच बीड पोलीस अधीक्षक कार्यालय यांना निवेदन सादर करून प्रशासनाला जाग करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी चार दिवसांपूर्वीच निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता, मात्र अद्याप प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. विशेष म्हणजे, गायरान गट नंबर 211 मध्ये सुरू असलेल्या सौरऊर्जा प्रकल्पासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी तोंडी काम थांबवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात ना काम थांबले ना कोणताही अधिकारी त्या ठिकाणी पाहणीसाठी गेला. त्यामुळे धारकांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी अधिकच वाढली आहे. धारकांनी असा इशारा दिला आहे की, "आम्ही आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. उद्या (दि. 22 एप्रिल) रोजी बीड जिल्ह्यात कुठल्याही शासकीय कार्यालयात आत्मदहनाची घटना घडू शकते." शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही गायरान धारकांकडून देण्यात आला आहे.




