आपला जिल्हाकृषीमहाराष्ट्र
कृषी शिक्षणाच्या विकासाला चालना – अंबाजोगाईत ३० कोटींची वसतिगृह योजना मंजूर
आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश अंबाजोगाई – अंबाजोगाईतील कृषी तंत्र विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची घोषणा झाली असून, नवीन वसतिगृह इमारतींसाठी तब्बल ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातील २ कोटी रुपये शासनाने वितरित करण्यास मान्यता दिली आहे. केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक वसतिगृह मिळणार अंबाजोगाई कृषी तंत्र विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगल्या निवास व्यवस्थेची गरज होती. याची दखल घेत आ. नमिता मुंदडा यांनी शासन दरबारी सातत्याने मागणी केली. महाराष्ट्र शासनाच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थिनींसाठी वेगवेगळ्या वसतिगृह इमारतींसाठी प्रत्येकी १४ कोटी ८७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी प्रत्येकी १ कोटी असा एकूण २ कोटी रुपयांचा निधी तातडीने वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. आधुनिक सुविधा असलेल्या वसतिगृहांची उभारणी या नव्या वसतिगृहांमध्ये सुरक्षित आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना आरामदायी निवास व्यवस्था, अभ्यासासाठी अनुकूल वातावरण आणि आवश्यक सुविधा दिल्या जातील. शासनाने ही कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून, निधी वेळेत वितरित केला जाईल. कृषी शिक्षणाच्या विकासाला चालना अंबाजोगाईमध्ये कृषी शिक्षणाच्या दर्जात मोठी सुधारणा होण्याच्या दृष्टीने हा निधी महत्त्वाचा ठरणार आहे. कृषी शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी शासन विशेष लक्ष देत आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या सुविधा आणि दर्जेदार शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचे आभार या निधीसाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या आ. नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि ना. पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले आहेत. या निर्णयामुळे अंबाजोगाई कृषी तंत्र विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना आधुनिक वसतिगृहांचा लाभ मिळणार असून, त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळणार आहे.
