मिनिमम 7500 रू.पेन्शन वाढीसाठी 31 जुलै 2024 रोजी जंतर-मंतर दिल्ली येथे ध्यानाकर्षण आंदोलन, बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन….सी. एम. राऊत जिल्हाध्यक्ष

भवानीनगर : रुपये 7500 अधिक महागाई भत्ता व मोफत वैद्यकीय सुविधा ही मिनिमम पेन्शन वाढीची मागणी आपण केंद्र सरकारकडून मिळवणारच असून मात्र पेन्शन धारकांनी मोठ्या प्रमाणावर संघटित होण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रीय संघर्ष समिती पुणे जिल्हा अध्यक्ष सी एम राऊत यांनी येथे बोलताना व्यक्त केले. इंदापूर तालुका राष्ट्रीय संघर्ष समितीने इंदापूर सणसर येथे आयोजित केलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सहविचार मेळाव्यामध्ये ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रीय संघर्ष समितीचे पुणे जिल्हा संघटक अजितराव घाडगे, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष इंद्रसिंग रजपूत, पुणे शहर अध्यक्ष मोहनराव शिंदे ,दौंड तालुका अध्यक्ष शिवाजीराव दिवेकर, तानाजी जाधव, दादासो थोरात, रमेश देशपांडे, गोविंद घुले, विनयकुमार कुलकर्णी, महादेव सूर्यवंशी, जगन्नाथ संकपाळ, महादेव गोरे, भरत सपकळ व इतर अनेक सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.

देशामध्ये 75 लाख व महाराष्ट्रामध्ये 12 लाखाहून अधिक सेवानिवृत्त कर्मचारी असताना देखील आंदोलनासाठी काही प्रमाणातच सेवानिवृत्त कर्मचारी जमत आहे ही खेदाची असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की 31 जुलै 2024 रोजी जंतर मंतर, दिल्ली येथे ध्यानाकर्षण आंदोलनाचे आयोजन केलेले असून या आंदोलनाला व 13 जुलै 2024 रोजी पुणे येथे आयोजित केलेल्या मेळाव्याला मोठ्या संख्येने सेवानिवृत्ती पेन्शनधारक कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले. जर मोठ्या प्रमाणावर सेवानिवृत्त कर्मचारी संघटित झाले तरच आपण केंद्र सरकारवर आपल्या मागण्यांसाठी दबाव आणू शकतो. ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समितीची महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांचे राज्यस्तरीय चर्चासत्र आणि ईपीएस-९५ पेन्शनधारकांचा राज्यस्तरीय मेळावा शिर्डी येथे नुकताच दिनांक २३ जून २०२४ रोजी ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाला. चर्चासत्रात व मेळाव्यात ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ३१जुलै २०२४ रोजी सकाळी १० वाजता जंतर-मंतर दिल्ली येथे ध्यानाकर्षण आंदोलन करण्याचे ठरले आहे या आंदोलनासाठी आपल्या तालुक्यातील जास्तीत जास्त पेन्शनर्सानी भाग घेऊन आंदोलन यशस्वी करण्यासाठी सदर सहविचार मेळाव्याचे आयोजन केले होते. तसेच 13 जुलै 2024 रोजी पुणे येथे होणाऱ्या मेळाव्या बाबत व येणाऱ्या भविष्य काळातील आंदोलनाची दिशा व रणनिती याबाबत यामध्ये विचारविनिमय करणेत आला.

सूत्रसंचालन व प्रास्ताविक इंदापूर तालुका अध्यक्ष प्रकाश शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन इंदापूर तालुका संघटक एम डी भांडवलकर यांनी केले.



