*राष्ट्राच्या हितासाठी अन्न, धान्य व विजेची बचत करा. संस्थेच्या ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेचे संस्थापक राधेश्याम चांडक यांचे आवाहन*

बुलडाणा (विषेश प्रतिनिधी सखाराम कुलकर्णी नांदेड) -बुलडाणा अर्बन हो- ऑप. क्रेडिट सोसायटी लि. बुलडाणा संस्थेची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २५ रविवार रोजी बुलडाणा येथे संपन्न होऊन या सभेत ३७ वा वार्षिक अहवाल सादर केला. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी सभासद व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना अवाहन केले की विविध प्रकारे आपल्याकडून ४० टक्के धान्य ,अन्न वाया जाते. त्याची बचत करावी. तसेच विजेचीही बचत होण्यासाठी प्रत्येकांनी आपल्या शेतात व घरावर सौर ऊर्जा लावावे यातून भारताचे ,राष्ट्राचे हित जोपासल्या जाईल.

बुलडाणा अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटीची स्थापना १९८६ ला झाली. असून लावलेल्या या रोपट्याचे वटवृक्ष होऊन संस्थेच्या ४७५ शाखा झाल्या. अशा या लोकप्रिय व समाजातील सर्व घटकात लोकप्रिय झालेल्या संस्थेची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २५ रोज रविवार रोजी संपन्न होऊन ३७ वा वार्षिक अहवाल सादर केला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने होऊन संस्थेतील विशेष कार्य केलेल्या काही कर्मचाऱ्यांचा सत्कार अध्यक्ष चांडक यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर संस्थेचे मुख्य व्यवस्थापक डॉ. सुकेश झंवर यांनी संस्थेने आतापर्यंतचे केलेले कार्य व पुढे करण्यात येणाऱ्या कार्याची माहिती दिली. संस्थेच्या ४७५ शाखा असून महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गुजरात ,आंध्र प्रदेश ,गोवा, अंदमान आणि निकोबार येथे कार्यक्षेत्र आहे. संस्थेचा व्यवसाय २० हजार कोटीचा होऊन सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात संस्थेला ५१ कोटीचा नफा झाला आहे. संस्थेचे ४१३ वेअर हाऊस असून यात काही वातानुकूलित वेअर हाऊस आहेत. संस्थेच्या २२ शाळा आहेत. यात २५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेचे वेदपाठ शाळा, तिरुपती, माहूर, तुळजापूर, शिर्डी येथे अद्यावत भक्तनिवास आहेत. अशी संस्थेची विस्तृत माहिती देत डॉ.झंवर म्हणाले हे सर्व यश आपल्या सर्वांच्या सहकार्याने व आपला संस्थेवर असलेल्या विश्वासामुळे व सर्वात महत्त्वाचे संस्थेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक जी यांच्या मेहनतीमुळे आले आहे. अध्यक्षीय भाषणात संस्थापक राधेश्याम चांडक म्हणाले संस्थेची माहिती मुख्य व्यवस्थापक डॉ. झंवर यांनी दिलीच .पण आमचे ध्येय उद्दिष्ट सांगतो की संस्थेच्या नफ्याचा लाभ समाजातील सर्व घटकांना मिळावा हा आमचा मुख्य हेतू. संस्थेचे जास्तीत जास्त वेअर हाऊस बांधून शेतकऱ्यांचा मालाला सुरक्षित ठेवणे हे आम्ही ठरवले असून, जेथे शाखा तेथे वेअर हाऊस, ते संस्थेचे असो अथवा किरायाने घेतलेले असो. भारतात अन्नाची व धान्याची नासाडी ४० टक्के होते. ही नासाडी आपण वाचवली तर या अन्नातून ,धान्यातून चार राष्ट्र जगतील. सर्व उपस्थित सभासदांनी व कर्मच्यार्यांनी शपथ घ्यावी की अन्न वाया जाणार नाही इतकच अन्न ताटात घेईल व घरातील धान्य नाश होऊ देणार नाही अशी शपथ घेण्याचे चांडक यांनी आजच्या सभेत सभासदांना व कर्मचाऱ्यांना आवाहन केले. त्याचबरोबर भारतात विजेचा तुटवडा नेहमी जाणवतो तो कमी करण्यासाठी अथवा संपवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या शेतात व घरावर सोलार बसवावे, त्यामुळे विजेवर जास्त भार येणार नाही. राष्ट्राला वीज निर्मितीसाठी कोळसा व पाणी मोठ्या प्रमाणात लागते ते कमी प्रमाणात लागून राष्ट्राची बचत होईल. लग्न समारंभातील पाचशे रुपये ते ५ हजार रुपयाच्या थाळीवर चांडक यांनी सडकून टीका केली. व थालीच्या या स्पर्धेमुळे बरेच वधू वर पिता कर्जबाजारी होत आहेत. तर ही स्पर्धा बंद करावी असे ते म्हणाले. शेवटी संस्थेने एटीएम सुरू करावी अशी मागणी होत असताना चांडक यांनी फार मोठा खुलासा करत सांगितले की दोन वर्षात एटीएम कालबाह्य होईल व प्रत्येकाच्या हातावर टॅटू नोंदवल्या जाणार व या टॅटूने पैसे काढणे , वाहन परवाना व इतर अशा बऱ्याच बाबी राहतील. आपला भारत इतका प्रगतीपथावर गेला आहे असे सांगून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांच्या सहकार खात्याच्या कामकाजाबद्दल व केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कामांची भरभरून स्तुती केली. आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व कार्यकारी मंडळ, पुणे विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे संस्थेचे सर व्यवस्थापक कैलास कासट यांचे सह सर्व कर्मचारी सभासद मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. शेवटी डॉ. किशोर केला यांनी आभार व्यक्त केले.



