आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*शिक्षण विभाग नांदेडच्या सन २०२१ अगोदरच्या ६० ते ७० वर्षाचे अभिलेखे चोरीला गेल्याच्या बनावट फिर्यादीची सीबीआय कडे चौकशीची मागणी*

Spread the love

नांदेड:- नांदेडच्या शिक्षण विभागातील अति महत्त्वाचे असलेले अभिलेखे, संचिका त्यात शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेची प्रस्ताव असलेल्या २०२१ अगोदरच्या सर्व फाईल म्हणजे जवळपास ६०ते ७९ वर्षाच्या संचिका चोरीला गेल्याची फिर्याद उपशिक्षणाधिकारी माध्यमिक दिलीप कुमार बनसोडे यांनी वजीराबाद पोलीस स्टेशनला दि. १५- ९- २०२२ ला दिली. त्या फिर्यादीच्या एफ. आय. आर. च्या नोंदीवरून फिर्याद बनावट असल्याचे दिसत आहे. अशा बनावट फिर्यादीची व झालेल्या बनावट तपासाची सत्य चौकशी व चोरीचे सत्य प्रकरण उजेडात यावे यासाठी ही चौकशी सीबीआयने करावी अशी मागणी जेष्ठ पत्रकार सखाराम कुलकर्णी यांनी मा. संचालक सीबीआय दिल्ली यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

नांदेडचा शिक्षण विभाग कोणत्या न कोणत्या भानगडीत नेहमीच चर्चेत असतो. सन २०१२नंतर शासनाने शिक्षक भरती बंद केली होती. पण नांदेड जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारे नियमबाह्य भरती झालेली आहे. सन २०२१ च्या अगोदर नांदेडला बाळासाहेब कुंडगीर माध्यमिक शिक्षणाधिकारी होते त्यांनी बऱ्याच नियमबाह्य शिक्षकांना वैयक्तिक मान्यता दिल्या व त्यावेळेस उपशिक्षणाधिकारी माध्यमिक पदावर दिलीप कुमार बनसोडे त्यांचे उजवा हात होते. हे सर्वांनाच माहित आहे. कर्तव्यदक्ष शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी मागील वैयक्तिक मान्यतेचे प्रस्ताव तपासणे व त्या प्रस्ताव तपासणीचे ११ निकष लावले ते निकष २०२१ च्या अगोदरच्या शिक्षक वैयक्तिक मान्यतेस अडचणीचे ठरू शकतात असे शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांना दिसले. नांदेडच्या शिक्षण विभागाने ते प्रस्ताव तपासल्या जाऊ नये म्हणून २०२१ अगोदरच्या वैयक्तिक मान्यता प्रस्ताव, शाळा वेतन अनुदान ,बिंदू नामावली संचिका अशा महत्त्वाच्या संचिका चोरी गेल्याची फिर्याद वजीराबाद पोलीस स्टेशनला देऊन आपले हात वर केले. आता कोणी माहितीच्या अधिकारात २०२१ च्या अगोदरचा प्रस्ताव मागितला तर त्यास शिक्षण विभागाकडून एफ. आय. आर .ची प्रत दिली जाते.
या संचिका चोरीच्या फिर्यादीचा सविस्तर तपशील असा की २०२१ च्या अगोदरचे शिक्षक वैयक्तिक मान्यता प्रस्ताव, बिंदू नामावली रजिस्टर, वेतने तर अनुदान संचिका यासह इतर महत्त्वाच्या अकरा विषयाच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या संचिका मल्टीपरपज हायस्कूल नांदेड येथून दिनांक १६-७- २०२२ रोजी रात्री सात वाजता व दि.१८ -७- २०२२रोजी सकाळी दहाच्या दरम्यान चोरीला गेल्या. ही चोरी झालेली उपशिक्षणाधिकारी माध्यमिक दिलीप कुमार बनसोडे यांनाच समजली. त्यांनी याचा जास्त गाजावाजा केला नाही व नंतर या चोरीची फिर्याद वजीराबाद पोलीस स्टेशन येथे दि.१५ -९- २०२२ला दिली .अती महत्त्वाचे असलेल्या संचीका चोरीला गेल्याचे बनसोडे यांना समजल्यावर तब्बल दोन महिन्याने उशिरा ही फिर्याद दिली. सन २०२१ अगोदरच्या म्हणजे ६० ते ७० वर्षाच्या संचिका चोरीला गेल्या. म्हणजे चोर या संचिका एक दोन थैल्यात नेऊ शकला नसेल. कमीत कमी दोन ते तीन ट्रक या कागदाने भरलेले असतील. हे ट्रक शहराच्या मध्यवस्तीतून जाताना कोणालाही कशी दिसले नाहीत. अथवा सीसी टीव्हीत कोठेही कसे आले नाहीत. हा प्रश्न निर्माण होतो. तर वजीराबाद पोलिसांनी या दि.१५ -९- २०२२च्या दिलीप कुमार बनसोडे यांच्या फिर्यादीवरून एफ. आय. आर. ची नोंद केली. पण पोलिसांनी तपास कसा व काय केला हे मात्र गुपित आहे. शिक्षण विभागातील शिपायापासून शिक्षणाधिकारी पर्यंत जवाब, साक्षी घेतल्या का? ही कागद चोरने हे कोणाला फायद्याचे आहे. एखाद्या चोराला कागद चोरी करण्याचा काय फायदा .नगदी रक्कम, सोने-चांदी अशा वस्तू चोरांच्या फायद्याच्या. चोर या कागदाची रद्दी करू शकतो ,नाहीतर होळी करू शकतो .पण या संचिका चोरीला गेल्याचे दाखवून ६०ते ७० वर्षाचे महत्त्वाचे अभिलेखे लपवण्यामागे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे फार मोठे हित असल्याचे दिसते. या अति महत्त्वाच्या संचिका अभिलेखांचा चोरीची सत्य चौकशी व्हावी व सत्य प्रकार उजेडात यावा. यातून गैरप्रकार उजेडात आला तर शासनाचे कोट्यावधीचे अनुदान ,वेतन देण्याचा भुर्दंड कमी होईल. या सखोल चौकशीसाठी जेष्ठ पत्रकार सखाराम कुलकर्णी यांनी शिक्षण आयुक्त पुणे ,पोलीस अधीक्षक नांदेड, संचालक सीबीआय दिल्ली ,पोलीस महासंचालक मुंबई यांना निवेदन दिले आहे. व या प्रकरणाच्या चौकशीसाठी लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार अशी ही माहिती त्यांनी दिली.

ही चौकशी कशी होणार व शिक्षण विभागाचे काय काय भानगडी चव्हाट्यावर येणार याकडे शिक्षण क्षेत्रातील सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!