ताज्या घडामोडी

रस्ते-नाल्यांपेक्षा शिक्षणातून घडणारा बदल अधिक महत्त्वाचा” – डॉ. नवनाथ घुगे

होळ (प्रतिनिधी) – होळ ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आज उत्साहात पार पडला. गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या सोहळ्यास डॉ. नवनाथ घुगे, डॉ. विवेक सरवदे, होळगावचे युवा व तडफदार नेतृत्व योगेश भैया शिंदे, माजी सरपंच बाळासाहेब घुगे, ग्रामविकास अधिकारी वर्पे, माजी सरपंच उत्तमराव शिंदे, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. नवनाथ घुगे म्हणाले, “रस्ते, नाल्या, बांधकाम ही कामे महत्त्वाचीच आहेत; मात्र त्यापेक्षा शिक्षणातून घडणारा सकारात्मक बदल अधिक महत्त्वाचा आहे.” त्यांनी आदरणीय संभाजी दादा, दीपक दादा यांसारख्या गावच्या भूषणांचा उल्लेख करत त्यांच्या कार्याची आठवण करून दिली. “अत्यंत कठीण परिस्थितीतून त्यांनी कष्ट करून गाव, तालुका, जिल्हा नव्हे तर महाराष्ट्र व देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले. ही प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे,” असे त्यांनी नमूद केले. गावातील राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे विकासकामे राबविण्याचे आवाहन करत “गावातील तरुणांना संधी व योग्य दिशा दिल्यास ते नक्कीच मोठे कार्य करून दाखवतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ग्रामपंचायतीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या लायब्ररी उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले. “भव्य व सुसज्ज वाचनालयातून विद्यार्थी घडतील, शिकतील आणि गावाचे भविष्य उज्ज्वल होईल,” असे सांगत त्यांनी या लायब्ररीसाठी आवश्यक असणारे इंटरनेट कनेक्शन, पुस्तके किंवा इतर कोणत्याही स्वरूपाची मदत स्वतःकडून देण्याची ग्वाही दिली. योगेश भैया शिंदे व त्यांच्या टीमच्या कार्याचे कौतुक करताना त्यांनी म्हटले की, “गरिबातील गरीब माणसासाठी चांगले काम करण्याची तळमळ या टीममध्ये दिसून येते. ग्रामपंचायतीला नागरिकांनी कायम साथ द्यावी.” शेवटी ग्रामपंचायत व सर्व टीमचे अभिनंदन करत त्यांनी पुढील विकासकामांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. होळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या विकास उपक्रमांमुळे गावाच्या प्रगतीला नवे बळ मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!