ताज्या घडामोडी
प्रामाणिकतेचा आदर्श : गॅरेज चालकाने लाखो किमतीचा मुद्देमाल पोलीसांकडे सुपूर्द
भरारी न्यूज | अंबाजोगाई अंबाजोगाई शहरात प्रामाणिकतेचे उत्तम उदाहरण समोर आले आहे. दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४.३० वाजण्याच्या दरम्यान किरमानी नगर दर्गा, चनई परिसरात खलील रफिक शेख (रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई) यांना रस्त्याच्या कडेला एक पर्स सापडली. शेख हे व्यवसायाने गॅरेज चालक असून त्यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत तत्काळ योग्य पाऊल उचलले. सदर पर्समध्ये अंदाजे ₹७५,००० ते ₹८०,००० इतकी रोख रक्कम, एक मोबाईल फोन तसेच सोन्याचे दागिने असा मौल्यवान मुद्देमाल होता. पर्स मिळाल्यानंतर त्यांनी त्वरित अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील एपीआय ठाकूर यांच्याशी संपर्क साधून प्रामाणिकपणे पर्स पोलीस स्टेशन अंबाजोगाई शहर येथे जमा केली. दरम्यान, पर्समधील मोबाईलवर आलेल्या दूरध्वनीच्या आधारे चौकशी केली असता सदर पर्स ही राधा ऋषिकेश पवार (रा. डोंगर पिंपळा) यांची असल्याचे निष्पन्न झाले. संबंधित महिला आपल्या लहान मुलांना टॉयलेटला बसवताना घाईत पर्स रस्त्याच्या कडेला विसरून गेल्याचे समोर आले. त्यानंतर पवार कुटुंबीयांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून योग्य ती खातरजमा करून सर्व मुद्देमाल त्यांच्या ताब्यात देण्यात आला. खलील रफिक शेख यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणा व सामाजिक बांधिलकीबद्दल पोलीस स्टेशन अंबाजोगाई शहर येथे त्यांचा सत्कार करण्यात येऊन अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या या आदर्श कृतीमुळे समाजात सकारात्मक संदेश पसरला असून सर्वत्र त्यांच्या इमानदारीचे कौतुक होत आहे. तसेच पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी व कोणतीही हरवलेली वस्तू मिळाल्यास ती तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात जमा करून सहकार्य करावे.




