ताज्या घडामोडी
ढोकी शिवारातील जळीत महिलेच्या खुनाचा उलगडा; प्रेमसंबंधातून गुन्हा घडल्याची कबुली
धाराशिव प्रतिनिधी.. धाराशिव तालुक्यातील रुई-ढोकी शिवारात दोन दिवसांपूर्वी आढळलेल्या अज्ञात तरुणीच्या जळालेल्या मृतदेहाचा गुन्हा पोलिसांनी अवघड तपासानंतर उलगडला आहे. मृत महिलेची ओळख पटली असून हा खून प्रेमसंबंधातून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पुण्यातून अपहरण करून धाराशिवमध्ये आणत आरोपीने निर्घृण खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याचे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. पुणे–धाराशिव कनेक्शनमुळे तपासाला मिळाला वेग राणी (मृत महिला) हिला 19 नोव्हेंबर रोजी वाकड पोलीस ठाण्यात बेपत्ता घोषित करण्यात आले होते. ती मुलांना शाळेत सोडण्यासाठी घराबाहेर पडली असताना तिचे अपहरण करण्यात आले होते. सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपी तिला वेगनर आर गाडीतून घेऊन जात असल्याचे दिसून आले. त्यानुसार वाकड पोलिसांनी मुख्य आरोपी अनिकेत महादेव कांबळे (रा. नितळी, जि. लातूर) याला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. प्रेमसंबंधातून शोकांतिका प्राथमिक तपासानुसार आरोपी अनिकेत आणि राणी यांच्यात प्रेमसंबंध होते. 19 नोव्हेंबर रोजी त्याने तिला पुण्यातून पळवून आणले. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील ढोकी हद्दीतील निर्जन स्थळी नेऊन तिचा खून केला. ओळख पटू नये म्हणून मृतदेहावर पेट्रोल ओतून जाळून आरोपी पसार झाला. जळालेला मृतदेह आणि तपासातील टर्निंग पॉईंट 27 नोव्हेंबर रोजी सकाळी रुई-ढोकी रेल्वे फाटकाजवळ 18 ते 23 वर्षे वयोगटातील महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. चेहरा व शरीर पूर्णतः जळाल्यामुळे ओळख पटवणे आव्हानात्मक होते. पोलीस पाटील राहुल वाकोरे यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) आणि 228 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. तपासात मिळाले यश ढोकी पोलिसांच्या समन्वयाने वाकड पोलिसांनी सीसीटीव्ही, मिसिंग तक्रार आणि वाहन तपशीलांच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचत हा गुन्हा उकलला. मृत महिलेची ओळख पटताच तिचे नातेवाईक ढोकी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. पुढील तपास दोन्ही पोलिसांकडून संयुक्तपणे सुरू आहे.




