ताज्या घडामोडी

*‘विघ्नवाट’ला ग्रामपंचायतीत प्रेक्षणास परवानगी द्या* *प्रतीभा फाउंडेशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : वाढत्या आत्महत्या थांबविण्यासाठी ‘प्रतिभा’चे सकारात्मक पाऊल*

यवतमाळ प्रतिनिधी : ‘‘विघ्नवाट संघर्ष शेतकऱ्यांचा’’ मराठी लघुपटाला संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत प्रेक्षणास परवानगी द्यावी, अशी मागणी प्रतिभा फाउंडेशनच्या संस्थापीका प्रतीभा पवार यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. जिल्ह्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्या हा अत्यंत गंभीर विषय आहे. देशपातळीवर शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्याची यवतमाळची नोंद झाली आहे. २०२५ या वर्षांत ११ महिन्याच्या कालावधीत ३३६ शेतकऱ्यांनी टोकाचा निर्णय घेत आपली जिवनयात्रा संपविली आहे. या आत्महत्या थांबाव्‍यात यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होणे नितांत आवश्यकता. याच पार्श्वभूमीवर विघ्नवाट या लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे. तो प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये शेतकऱ्यांना दाखविल्यास आत्महत्येचे विघ्न टळु शकते, अशा उदात्त हेतूने भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ (भारत) संलग्न संस्था प्रतिभा फाऊंडेशन, यवतमाळ यांच्या वतीने शेतकरी बांधवांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, आत्महत्यांचे प्रमाण कमी करणे व शेतीविषयक सामाजिक जागरूकता वाढविणे या उद्देशाने “विघ्नवाट संघर्ष शेतकऱ्यांचा” हा सामाजिक मराठी लघुपट तयार करण्यात आलेला आहे. यवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असल्याने पीक कर्ज, हवामान बदल, कीटकनाशके व रासायनिक खतांचा अतिरेक, उत्पादन खर्चातील वाढ, बाजारभावातील तफावत, शासन योजनांबाबत अपुरी माहिती, नैसर्गिक आपत्ती इत्यादी कारणांमुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला नैराश्याचा कल दूर होणे अत्यंत आवश्यक आहे. ग्रामीण समाजात सकारात्मक विचार रुजवून, संकटातून मार्ग काढण्याची जिद्द निर्माण करण्याचा संदेश या लघुपटाद्वारे प्रभावीपणे देण्यात आला आहे.या लघुपटाद्वारे— शेतकऱ्यांना प्रतिकूल परिस्थितीतून धैर्याने बाहेर पडण्यासाठी प्रोत्साहन, सकारात्मक सामाजिक दृष्टीकोन, सावकार, समाज व कुटुंब यांच्यातील परस्पर सहकार्याचा संदेश, आत्महत्येपासून दूर राहून संघर्षमय पण यशस्वी जीवनाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा अशी जनजागृती करण्यात येत आहे. सदर जनजागृती मोहिमेअंतर्गत संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये हा लघुपट प्रदर्शित करण्याचा मानस आहे. ही सामाजिक मोहीम शेतकरी बांधवांच्या हितासाठी आणि आत्महत्या प्रतिबंधासाठी नक्कीच उपयुक्त व परिणामकारक ठरेल, अशी आम्हाला खात्री आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती व संबंधित विभागांना निर्देश देऊन ‘‘विघ्नवाट संघर्ष शेतकऱ्यांचा’’ लघुपट प्रेक्षणासाठी आवश्यक परवानगी देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. तसेच यासाठी मा. जिल्हा प्रकल्प अधिकारी, पंचायत विभाग, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग), सर्व तालुका पंचायत अधिकारी, ग्रामसेवक यांना आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात, अशी देखील मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!