ताज्या घडामोडी
हनुमंत सादुळे स्वराज्य शक्ती सेनेच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी नियुक्त
अंबाजोगाई : ग्रामीण भागातील अडीअडचणीत धावून जाणारे, सामाजिक कार्यातून लोकांशी घट्ट नातं जोडणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले हनुमंत विष्णू सादुळे यांची स्वराज्य शक्ती सेनेच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. उपगावांमधून सामाजिक कार्याचा संघर्ष करत, जनतेच्या प्रश्नांसाठी नेहमी पुढाकार घेणारे सादुळे आता स्वराज्य शक्ती सेनेच्या माध्यमातून तालुक्यात संघटन मजबूत करण्यासाठी कार्यरत राहणार आहेत. या नियुक्तीप्रसंगी स्वराज्य शक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्षा करुणाताई धनंजय मुंडे आणि बीड जिल्हाध्यक्ष नवनाथ हारे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून सादुळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष नवनाथ हारे यांनी सांगितले की, “येणाऱ्या काळात स्वराज्य शक्ती सेना ही बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संघटन विस्तारून प्रभावी स्थान निर्माण करेल.” अंबाजोगाई तालुका उपाध्यक्षपदी महेश अशोक मोरे बर्दापूर यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या कामाची दखल घेत स्वराज्य शक्ती सेनेने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. मोरे यांनी संघटनेच्या वाढीसाठी केलेल्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले. दरम्यान, संघटनेचा विस्तार करताना गेवराई तालुका अध्यक्षपदी संकेत राजेश पवार आणि केज तालुका महिला अध्यक्षपदी कविता भांगे यांची निवड करण्यात आली. त्यांच्या विविध सामाजिक कार्याची दखल घेऊन संस्थापक अध्यक्षा करुणाताई मुंडे आणि जिल्हाध्यक्ष नवनाथ हारे यांनी त्यांना नियुक्तीपत्र देऊन गौरविले. स्वराज्य शक्ती सेनेच्या या नव्या जबाबदाऱ्या तालुक्यातील तरुणांना नवसंजीवनी देत, आगामी काळात संघटनेचे बळकटीकरण अधिक गतिमान करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.




