ताज्या घडामोडी
रिपब्लिकन बहुजन सेना संघटनेमध्ये नव्या जोमाने संघटनात्मक बळकटी
अंबाजोगाई. रिपब्लिकन बहुजन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय घाटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकरवादी तत्वज्ञान घराघरात पोहोचविण्याच्या दिशेने संघटनेने निर्णायक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. समाजातील वंचित, वगलित, पीडित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी तळागाळात संघटन विस्तार करण्याच्या धोरणाअंतर्गत बीड जिल्हा पातळीवर महत्त्वपूर्ण नियुक्त्यांची घोषणा नुकतीच करण्यात आली. समाजातील अन्यायाविरुद्ध सतत सजगपणे लढा देत अंबाजोगाई शहरात स्वतःची वेगळी ओळख प्रस्थापित करणारे जाज्वल्य युवा नेते बाबासाहेब गायकवाड यांची बीड जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. दलित, बहुजन समाजावर होणाऱ्या अत्याचारांना विरोध करत विविध आंदोलनांच्या माध्यमातून गायकवाड यांनी सामाजिक जबाबदारी पार पाडल्याचे संघटनेने गौरवले आहे. संघटनेच्या बळकटीसाठी, विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी हे पद सोपवण्यात आल्याने जिल्ह्यातील कार्यसंघ अधिक गतिमान होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. याच सोबत अंबाजोगाई तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवून जनमानसात भक्कम स्थान निर्माण करणारे मधुकर गांगणे यांची अंबाजोगाई तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक बांधिलकी जपत बहुजन हितासाठी केलेले त्यांचे बहुमूल्य योगदान पाहता भावी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये संघटनेचे वर्चस्व भक्कम करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी त्यांना सोपविण्यात आली आहे. नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे अंबाजोगाई व बीड जिल्ह्यातील संघटनात्मक घडामोडींमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. बहुजन समाजातील समस्यांविरोधात निर्णायक आवाज बुलंद करणाऱ्या या दोन्ही होतकरू नेतृत्वामुळे संघटना अधिक मजबूत आणि गतिशील होणार आहे. या भव्य कार्यक्रमाचे आयोजन बीड जिल्हाध्यक्ष अनिल सावंत, युवा जिल्हाध्यक्ष दयानंद लांडगे, जिल्हा सचिव राजेंद्र इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत होके आणि अरुण ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच प्रा. कालिदास सुरवसे सर यांचे थोर मार्गदर्शन लाभले. संघटनेच्या जनहितवादी आणि आंबेडकरवादी चळवळीस नवी दिशा देण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या या महत्वपूर्ण निवडीमुळे जिल्ह्यात बहुजन समाजात नवचैतन्य निर्माण झाले असून नव्या नेतृत्वाकडून समाजमनात मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.




