ताज्या घडामोडी

विद्यापीठ वर्धापन दिन उत्साहात साजरा

पाचोड : शिवछत्रपती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालय परिसरात सकाळीच राष्ट्रीय ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थित शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी यांच्या घोषणाबाजीमुळे परिसर देशभक्तिपूर्ण वातावरणाने भारावून गेला. ध्वजारोहणानंतर डॉ. तुकाराम गावंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी विद्यापीठाच्या निर्मितीपासून ते आजवरच्या प्रवासाचा आढावा घेतला. मराठवाड्यातील जनतेच्या संघर्षातून हे विद्यापीठ उभे राहिले असून त्याच्या स्थापनेपासून आजपर्यंत शिक्षण, संशोधन, समाजसेवा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला. तसेच उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यापीठाने साधलेली प्रगती, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या संधी आणि ग्रामीण भागातील मुलामुलींना लाभलेली शैक्षणिक दारे यांचा त्यांनी तपशीलवार ऊहापोह केला. यावेळी प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. त्यांनी विद्यापीठ नामांतर चळवळीची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने विद्यापीठ नामांतर करण्यासाठी झालेला संघर्ष, विद्यार्थ्यांची सहभागिता, आंदोलनातील हकनाक बळी आणि समाजाच्या एकतेची ताकद याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. "विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षण घेऊन थांबू नये, तर समाजातील बदलासाठी सजग राहिले पाहिजे," असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. शिवाजी यादव, डॉ. सुरेश नलावडे, डॉ. सुभाष पोटभरे, डॉ. गांधी बानायत, डॉ. हेमंतकुमार जैन, डॉ. विलास महाजन, डॉ. उत्तम जाधव, डॉ. भगवान, प्रा. विनोद कांबळे, प्रा. सचिन कदम, प्रा. अरुणा दसपुते आदी प्राध्यापक उपस्थित होते. तसेच सतीश वाघ, उमाकांत भोसले, प्रतीक देशमुख, वैभव राऊत यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची जाणीव जागृत झाली असून विद्यापीठाशी असलेले आपलेपण व अभिमान वृद्धिंगत झाला. वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमामुळे विद्यापीठाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे नव्या पिढीपर्यंत पोहोचले.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!