आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र
अंबाजोगाईतील खाजगी कोचिंग क्लासेस समोर तक्रार निवारणपेटी बसवण्याची मागणी; सामाजिक कार्यकर्त्यांचे शहर पोलीस ठाण्याला निवेदन आशोक भाऊ गंडले, भिमसेन आप्पा लोमटे
अंबाजोगाई (उत्तरेश्वर शिंदे भरारी न्युज ) – अंबाजोगाई शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे अंबाजोगाई शहर सध्या खाजगी कोचिंग क्लासेसच्या वाढत्या संख्येमुळे चर्चेत आले आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक क्लासेस समोर तक्रार निवारणपेटी (Complaint Box) बसवण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्री. भीमसेन आप्पा लोमटे व श्री. अशोक भाऊ गंडले यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनमध्ये अधिकृत निवेदन सादर केले आहे. यामध्ये त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, अलीकडच्या काळात जिल्ह्यातील काही शैक्षणिक संस्थांमध्ये घडलेल्या घटना अत्यंत गंभीर आणि चिंता निर्माण करणाऱ्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना अंबाजोगाई शहरात घडू नयेत यासाठी पोलिसांनी विशेष दक्षता घ्यावी. निवेदनात पुढे म्हटले आहे की, खाजगी कोचिंग क्लासेसच्या परिसरात पोलिसांनी नियमित गस्त घालावी. प्रत्येक क्लासमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात यावी. तसेच कॉलेज परिसरात विनाकारण गर्दी करीत बसणाऱ्या किंवा फिरणाऱ्या मुलांवर निर्बंध घालावेत. विद्यार्थ्यांवर होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या मानसिक त्रासाला आळा घालण्यासाठी क्लासेस समोर तक्रारपेटी बसवणे आवश्यक आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना कोणताही अन्याय किंवा त्रास झाल्यास ते निर्भयपणे त्यात तक्रार नोंदवू शकतील. सामाजिक बांधिलकीतून पुढाकार घेत भीमसेन आप्पा लोमटे व अशोक भाऊ गंडले यांनी ही जनहितार्थ मागणी केली असून, शहर पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.




