आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचा 21 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा; गुणवत्तापूर्ण शिक्षणाची 21 वर्षांची प्रेरणादायी वाटचाल
अंबाजोगाई – भरारी न्युज उत्तरेश्वर शिंदे... अंबाजोगाईतील मोदी लर्निंग सेंटर, रिंग रोड येथील न्यू व्हिजन पब्लिक स्कूलच्या प्रांगणात श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचा 21 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी संस्थेच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेने दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यात आला. सन 2004 मध्ये श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना झाली. संस्थेच्या अंतर्गत विविध शैक्षणिक उपक्रम प्रभावीपणे राबवले जात आहेत. अंबाजोगाई परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि आधुनिक शिक्षण देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली न्यू व्हिजन पब्लिक स्कूल (CBSE) ही शाळा आज एका विशाल वटवृक्षासारखी बहरलेली आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना जीवनमूल्ये, शिस्त, संस्कार, विज्ञान, तंत्रज्ञान व संगणकाचे सर्वांगीण ज्ञान दिले जाते. या गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण होऊन गेलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. काही विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत तर काही समाजसेवेच्या माध्यमातून अंबाजोगाईचे नाव उज्वल करत आहेत. वर्धापन दिनाच्या निमित्ताने केक कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव श्री. राजकिशोर मोदी, कार्यकारी संचालक श्री. संकेतभैया मोदी, मार्गदर्शक बी. आय. खडकभावी, मार्गदर्शक वसंत चव्हाण, मार्गदर्शक डी. एच. थोरात, प्राचार्य एम. प्रशांत कुमार यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, पालक-शिक्षक समिती व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




