आपला जिल्हाताज्या घडामोडी
शिक्षणसंस्थेने शिक्षणच विसरले! योगेश्वरी शिक्षण संस्थेचे व्यावसायिक गाळे अवैध – लोक जनशक्ती पार्टीचा आक्रमक आक्षेप.
अंबाजोगाई (प्रतिनिधी) – अंबाजोगाई येथील नामांकित योगेश्वरी शिक्षण संस्थेने शिक्षण क्षेत्राचा मूळ उद्देश बाजूला ठेवून व्यावसायिक गाळ्यांचे अनधिकृत बांधकाम सुरू केल्याचा गंभीर आरोप लोक जनशक्ती पार्टीने केला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर आणि परिसरातील वातावरणावर घातक परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदर शिक्षण संस्थेच्या जागेवर, जी शासनाकडून फक्त शैक्षणिक हेतूसाठी देण्यात आलेली आहे, अनधिकृतरित्या व्यावसायिक गाळे उभारले गेले आहेत. या ठिकाणी हॉटेल्स, पान टपऱ्या, गुटखा विक्रेते, चायनीज गाड्या आणि इतर अवैध व्यवसाय सुरू होण्याचा धोका आहे. परिणामी, महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. विशेषतः विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या परिसरात असलेल्या गोदावरी बाई कुंकू योगेश्वरी शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासावरून हटून चुकीच्या मार्गाला लागण्याची भीती पालक व नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. लोक जनशक्ती पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष अशोकभैया काळे, परळी विधानसभा तालुकाध्यक्ष विशालभैया शेवाळे, केज तालुकाध्यक्ष गंगाधरभैया पोळ, तालुका उपाध्यक्ष आदित्यभैया चौरे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी अंबाजोगाई प्रशासनाकडे निवेदन देत या अवैध बांधकामाविरोधात तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. तसेच, या बांधकामांना परवानगी देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. “शैक्षणिक संस्थेने शिक्षण क्षेत्राचा मूलभूत उद्देश बाजूला ठेवून नफा मिळवण्यासाठी अशा प्रकारे व्यावसायिक गाळे बांधणे हे अत्यंत निषेधार्ह आहे. जर प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही, तर लोक जनशक्ती पार्टी रस्त्यावर उतरेल,” असा इशारा या वेळी देण्यात आला.




