आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र
केजच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या लक्षवेधीनंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात निलंबित
भरारी न्युज.. बीड : केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. नमिता मुंदडा यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेनंतर बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांना निलंबित करण्यात आले आहे. कोविड काळात ऑक्सिजन प्लांट्स, ऑक्सिजन पाईपलाइन टेंडर तसेच इतर खरेदी प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. विधानसभेत उपस्थित झाला भ्रष्टाचाराचा मुद्दा काल विधानसभेत आमदार सौ. नमिता मुंदडा यांनी बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या कार्यकाळातील कथित गैरव्यवहारांचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी कोविड काळातील ऑक्सिजन प्लांट उभारणी, ऑक्सिजन पाईपलाइन टेंडर प्रक्रिया तसेच इतर वैद्यकीय साधनसामग्रीच्या खरेदी व्यवहारात झालेल्या आर्थिक अनियमिततेबाबत विधानसभेत लक्षवेधी मांडली. सभापतींच्या निर्देशानंतर निलंबनाची कारवाई आमदार मुंदडा यांच्या लक्षवेधीनंतर सभापती राहुल नार्वेकर यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेतली. त्यानुसार, आरोग्य विभागाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. गैरव्यवहाराची चौकशी होणार? डॉ. थोरात यांच्या निलंबनानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि चौकशी सुरू होण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता होत आहे. ही कारवाई प्रशासनातील भ्रष्टाचारावर वचक बसवणारी ठरेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




