*विवाहितेवर अत्याचार प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता*

सोलापूर – शेतात काम करणाऱ्या विवाहितेला शिवीगाळ, मारहाण व धमकी देऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याच्या आरोपातून अस्लम सत्तार नदाफ (वय-२३ वर्षे, रा. मजरेवाडी, सोलापूर ) याची प्रमुख सत्र न्यायाधीश मोहम्मद सलमान आझमी यांनी निर्दोष मुक्तता केली.
याची हकीकत अशी की, दि. २६/०३/२०१८ रोजी सकाळी विवाहिता पिंजारवाडी येथील शेतात काम करत असताना आरोपीने तेथे जाऊन तिचा हात पीरगाळून, तोंड दाबून तिचेवर बलात्कार केला. त्यावेळी विवाहितेने आरडा ओरडा केला असता तिला आरोपीने शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी आरडा ओरडा ऐकून विवाहितेचा पती व त्याचा मित्र घटनास्थळी येताच आरोपी पळून गेला. अशा आशयाची फिर्याद विवाहितेने वळसंग पोलीस ठाण्यात दिल्यावरून गुन्ह्याचा तपास पो. उप. निरीक्षक ईनाईतुल्ला काझी यांनी केला.
प्रेमसंबंधातून घडलेला प्रकार नवऱ्याने पाहिल्यामुळे नवऱ्याच्या दबावातून खोटी फिर्याद दिल्याचा युक्तिवाद ॲड. अथर्व अंदोरे यांनी केला. तो युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीशांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
यात आरोपीतर्फ ॲड. आल्हाद अंदोरे, ॲड. समीर माशाळे, ॲड. अथर्व अंदोरे यांनी काम पाहिले. तर सरकार तर्फे ॲड. आनंद कुर्डुकर यांनी काम पाहिले.



