आपला जिल्हाक्राईमताज्या घडामोडीराजकीय

* मनोहर सपाटेंच्या पराभवासाठी खोटी बातमी दिल्याच्या आरोपातून महेश कोठेंसह संपादकाची निर्दोष मुक्तता*

Spread the love

सोलापूर – सन २००९ च्या शहर उत्तर विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार मनोहर गणपत सपाटे यांचा पराभव करण्याच्या उद्देशाने तात्कालीन कॉंग्रेस उमेदवार महेश विष्णूपंत कोठे आणि संपादक दिलीप दादाराव शिंदे यांनी संगनमत करुन सपाटेंनी कोठे यांना पाठिंबा दिल्याची बातमी प्रसिद्ध केल्याच्या आरोपातून माजी महापौर महेश कोठेंसह संपादक दिलीप शिंदे यांची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. प्रशांत वराडे यांनी निर्दोष मुक्तता केली.

याची हकीगत अशी, की सन २००९ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये सोलापूर शहर उत्तर मतदार संघातून कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून तात्कालीन कॉंग्रेसचे महेश कोठे हे निवडणूक रिंगणात असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मनोहर सपाटे यांनी बंडखोरी करुन अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. तेव्हा निवडणूकीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. १२/१०/२००९ रोजी संध्याकाळी ७ वाजता मतदारांची दिशाभूल करुन सपाटेंना पराभूत करण्याकरिता महेश कोठे व वृत्तपत्र संपादक दिलीप शिंदे यांनी ‘अर्थपूर्ण’ संगनमत करून नालंदा एक्सप्रेस या वृत्तपत्रात “अखेर महेश कोठे यांना मनोहर सपाटे यांचा पाठिंबा?” या मथळ्याखाली वृत्त छापले. ते वर्तमानपत्र मतदारसंघात वितरीत केले, अशा आशयाची फिर्याद मनोहर सपाटे यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात दिल्यावरुन कोठे व शिंदे यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम १७१(ग), ३४ प्रमाणे, तसेच वर्तमानपत्रे व पुस्तके नोदणी कायदा कलम ४ सह १३, ५(३)/१५ आणि लोकप्रतिनिधी कायदा कलम १२७(अ) प्रमाणे गुन्हा नोंदला होता. गुन्ह्याचा तपास तात्कालीन सहा. पो. नि. बाळासाहेब भालचीम यांनी केला. न्यायालयात मनोहर सपाटेंसह ९ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या..

कोठे व शिंदे या दोन्ही आरोपींविरुद्ध करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे व खोटे असून त्यांचा एकमेकांशी संबंध नाही. मतदारांची सहानुभूती मिळविण्याकरिता अपक्ष उमेदवाराने खोटी फिर्याद दिल्याचा युक्तिवाद ॲड. आल्हाद अंदोरे व ॲड. अथर्व अंदोरे यांनी केला. तो युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधिशांनी महेश कोठे व दिलीप शिंदे या दोघांची निर्दोष मुक्तता केली.

राजकीय क्षेत्रात गाजलेल्या या खटल्यात दोन्ही आरोपींतर्फे ॲड. आल्हाद अंदोरे व ॲड. अथर्व अंदोरे यांनी काम पाहिले. तर सरकारतर्फे ॲड. जे. व्ही. चेळेकर यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!